ज्याला तिकीट मिळेल, त्याचे काम करू; नाशिकच्या जागेबाबत भुजबळांची स्पष्टोक्ती

Lok Sabha Election 2024, Chhagan Bhujbal

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकच्या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. परंतु नाशिक लोकसभा मतदारसंघातून ज्याला तिकीट मिळेल, त्या महायुतीच्या उमेदवाराचे काम आम्ही करू, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी चंद्रपूरला जात असल्याचेही ते म्हणाले. घड्याळ हे पक्षचिन्ह सर्वोच्च न्यायालयातून आम्हालाच मिळेल असा दावाही भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केला आहे.

नाशिकच्या जागेवरून महायुतीत घमासान सुरू आहे. नाशिक शिवसेना, राष्ट्रवादी की भाजपच्या वाट्याला हे अद्यापही निश्चित होऊ शकलेले नाही. तिन्ही पक्षांनी आपला दावा कायम ठेवला आहे. शिवसेनेच्या शिंदे गटात विद्यमान खासदार हेमंत गोडसे व जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीकडून स्वत: भुजबळ यांनी या जागेवर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. तर भाजपमध्येही दिनकर पाटील, केदा आहेर, अॅड. राहुल ढिकले आदींची नावे चर्चेत आहेत. नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नसताना, छगन भुजबळ हे महायुतीच्या प्रचारासाठी बाहेर पडले असून, ते मंगळवारी (दि.१६) विशेष विमानाने चंद्रपूरला रवाना झाले. तत्पूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नाशिकच्या जागेबाबत भाष्य करताना भुजबळ म्हणाले की, नाशिकच्या जागेबाबत आज काही चर्चा झालेली नाही. जागावाटपासंदर्भात विमानात चर्चा होत नसतात. काही बोलायचे असेल तर, आम्ही फोनवर बोलू. जागावाटपासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल योग्य निर्णय घेतील आणि जो काही निर्णय होईल, त्या महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करू, असे सांगत भुजबळांनी नाशिकबाबत सुरू असलेल्या वादावर अधिक भाष्य करणे टाळले. आमचा पक्ष महायुतीचा घटक पक्ष असल्यामुळे महायुतीच्या प्रचार करणार आहोत. चंद्रपूरमध्ये भाजपचे उमेदवार सुधीर मुनगुंटीवार यांच्या प्रचारासाठी मी तीन सभा घेणार असून, विकास हा आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा असल्याचेही ते म्हणाले. जगातल्या राजकारणात युक्रेन-रशिया इराण- इस्रायल हे वाद सुरू आहे. त्यामुळे अशा स्थितीत देशाला खंबीर नेतृत्वाची गरज असल्याचे भुजबळांनी सांगितले. ओबीसी मुद्दा निघतो तेव्हा वातावरण तापवणारे कोण होते, कोणाच्या कारखान्यावर बैठका झाल्यात, कोणी ताकद दिली, कोण आमदारांचे घर जळत असताना शांत बसले होते, हे आम्ही विसरणार नाही, असे भुजबळांनी यावेळी सांगितले. (Chhagan Bhujbal)

सर्वोच्च न्यायालयात आम्हीच जिंकू!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये घड्याळ चिन्हाबाबत पक्षाने स्पष्टीकरण दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. निवडणुकीसाठी चिन्ह आवश्यक असते, अन ते आम्हाला मिळाले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही आम्हीच जिंकू, असा दावा करत, तोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचीही अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा –

The post ज्याला तिकीट मिळेल, त्याचे काम करू; नाशिकच्या जागेबाबत भुजबळांची स्पष्टोक्ती appeared first on पुढारी.