रामनवमी विशेष : काय आहे पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिराचा इतिहास?

काळाराम मंदिर pudhari.news

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा; पश्चिम भारतातील प्रभू रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे श्री काळाराम मंदिर हे होय. या ठिकाणी मंदिरात प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील दोन फुटी उंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येत असतो. यानंतर येणार एकादशीला भगवान राम, हनुमान आणि गरुड यांच्या रथाची पंचवटीतून यात्रा निघते. दोरीच्या साह्याने हे रथ ओढले जातात. यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असतात. (Ram Navami 2024)

जगप्रसिद्ध असलेले नाशिकचे काळाराम मंदिर हे काळ्या दगडात बांधलेले सुप्रसिद्ध मंदिर आहे. माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांच्या सांगण्यावरून हे मंदिर बांधण्यात आले. काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले आहे. ओढेकर यांना एके दिवशी स्वप्न पडले की गोदावरी नदीत रामाची काळ्या रंगाची मूर्ती आहे. त्यानंतर त्यांनी नदीतून त्या मूर्ती आणल्या आणि हे मंदिर बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते. सन १७७८-१७९० मध्ये या काळात हे मंदिर बांधण्यात आले. (Ram Navami 2024)

म्हणून म्हणतात ‘काळाराम’

मंदिरावरील कोरीव काम पाहण्यासारखे आहे. मंदिरासमोर भव्य सभा मंडप आहे. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात असून बांधकामाची शैली नागर आहे. मंदिरातील प्रभू रामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या असलेल्या मूर्तीही काळ्या दगडातीलच आहे. म्हणूनच त्याला काळाराम असे म्हणतात. राम मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जेथे राममंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहात असत.

प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते, असे मानले जाते. सदर मंदीराचे बांधकामासाठी दोन हजार कारागिर बारा वर्ष राबत होते. त्या काळात मंदिर बांधणीचा अंदाजे २३ लाख इतका खर्च आल्याचे सांगितले जाते. मंदिर परिसर २४५ फूट लांब व १४५ फूट रुंद आहे. मंदिर परिसराला १७ फूट उंच दगडाची भिंत आहे. मंदिराच्या चारही दिशांना चार दरवाजे आहेत. या मंदिराच्या कलशाची उंची ६९ फूट इतकी आहे. पूर्व महाद्वारातून आत गेल्यावर भव्य सभा मंडप असून ज्याची उंची १२ फूट आहे आणि येथे चाळीस खांब आहेत. हनुमान मंदिर असून ते आपल्या लाडक्या रामाच्या चरणांकडे बघताना दिसतात.

धार्मिक कथांनुसार, प्रभू श्रीराम वनवासात पंचवटीत राहिले तेव्हा ऋषीमुनींनी त्यांना राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त करण्यासाठी प्रार्थना केली. श्रीरामांनी त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि कृष्णरूप धारण करून ऋषीमुनींना राक्षसांच्या प्रकोपातून मुक्त केले.

पहाटे काकड आरती, सकाळी महापूजा

श्री राम नवमीनिमित्त वासंतिक नवरात्रोत्सवाचे आयोजन काळाराम संस्थानच्या वतीने करण्यात आलेले आहे. बुधवार (दि. १७) रोजी पहाटे साडेपाच वाजता काकड आरती, सकाळी सात वाजता महापूजा, दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव तर, सायंकाळी सात वाजता अन्नकोट महोत्सव होईल. शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी साडेचार वाजता श्रीराम व गरुड रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. २०) मंत्रजागर व गोपालकाल्याने महोत्सवाची समाप्ती होईल.

 हे ही वाचा :

 

The post रामनवमी विशेष : काय आहे पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिराचा इतिहास? appeared first on पुढारी.