दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये वेटरची चौकशी; गुड्डु मुस्लिम संबंधाची अफवा

पोलीस कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उत्तर प्रदेशमध्ये पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गुंड अतिक अहमद व त्याच्या भावाच्या हत्येनंतर त्यांचा साथिदार गुड्डू मुस्लिम याच्याशी संपर्कात असल्याच्या कारणावरून नाशिकमधून एकास ताब्यात घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र चौकशीत दिल्ली पोलिसांनी नाशिकमधील एका हॉटेलच्या वेटरची चौकशी केल्याचे स्पष्ट झाले. शस्त्र बागळल्याप्रकरणी असलेल्या संशयिताने वेटरसोबत संपर्क केल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांचे पथक नाशिकमध्ये आल्याचे समोर आले. त्यामुळे अतिक अहमद संबंधीत चौकशीच्या चर्चा अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये अतिक अहमदचा मुलगा असद याचा मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसांत शनिवारी (दि.१५) रात्री वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या व पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अतिकसह त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची तिघा मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर उत्तरप्रदेश पोलिसांचे पथक नाशिकला आले व त्यांनी शहरातून एकास ताब्यात घेतल्याची चर्चां रंगली. हत्येपूर्वी अशरफ अहमदने ज्या गुड्डू मुस्लिमचा उल्लेख केला तो गुड्डू नाशिकमधून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीसोबत संपर्कात असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली. मात्र याबाबत शहर पोलिसांनी नकार दिला असून अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगितले. सखोल चौकशीत दिल्ली पाेलिसांकडे शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यातील संशयिताचे नाशिकच्या अंबड एमआयडीसीमधील एका हाॅटेलमध्ये वेटरचे काम करणाऱ्यासाेबत मोबाइलवरून संभाषण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांचे विशेष पथक मध्यरात्री नाशिकला आलेले व त्यांनी वेटरची चाैकशी केली. चौकशीनंतर त्यास पुन्हा सोडून दिले व पथक दिल्लीला गेल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

हेही वाचा:

The post दिल्ली पोलिसांची नाशिकमध्ये वेटरची चौकशी; गुड्डु मुस्लिम संबंधाची अफवा appeared first on पुढारी.