नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाढत्या उष्णतेसोबत जिल्ह्यातील धरणांच्या जलसाठ्यातही झपाट्याने घसरण होत आहे. सद्यस्थितीत धरणांमध्ये केवळ ४१ टक्के जलसाठा आहे. दुसरीकडे टंचाईच्या झळा वाढून जिल्ह्यातील टँकरची संख्या १७० वर पोहोचली आहे. दुष्काळाची एकूण परिस्थिती बघता, जिल्हावासीयांनी आतापासूनच पाण्याची काटकसर करणे गरजेचे आहे.
मार्च महिन्याच्या प्रारंभीच जिल्हा तापायला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पारा थेट ३२.६ अंशांवर पोहोचला हाेता. त्यामुळे आतापासूनच जिल्हावासीयांना उन्हाचा कडाका जाणवत आहे. उन्हाचा चटका जाणवत असतानाच धरणांच्या पाणी पातळीतही झपाट्याने घट होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख २४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ २६ हजार ७२७ दलघफू म्हणजेच ४१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच कालावधीत हे प्रमाण ४१ हजार ३७० दलघफू (६३ टक्के) इतके होते. दरम्यान धरणांची खालावणारी पाणी पातळीही जिल्हावासीयांसाठी धाेक्याची घंटा आहे.
ग्रामीण भागात तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. मार्चच्या प्रारंभीच निम्म्या जिल्ह्यात टँकरचा फेरा वाढला आहे. आजघडीला सात तालुक्यांतील ५५९ गावे-वाड्यांना एकूण १७० टँकरच्या साहाय्याने पाणी पुरविले जात आहे. टँकरच्या दिवसाला ३५९ फेऱ्या मंजूर असून, प्रत्यक्षात ३५८ फेऱ्या होत आहेत. या टँकरच्या साहाय्याने एक लाख ३१ हजार ५२९ लोकसंख्येची तहान भागविली जात आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा उन्हाचा कडाका अधिक तीव्र असेल. ऐन एप्रिल-मे महिन्यांत ग्रामीण भागात पाण्याचा प्रश्न अधिक जटील होणार आहे. अशावेळी टँकरची संख्या ३७५ च्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे.
धरणांतील जलसाठा (दलघफू)
गंगापूर ३२३८, दारणा २६२९, काश्यपी १६७०, गाैतमी-गोदावरी ९२४, आळंदी ३६८, पालखेड ११२, करंजवण २४८६, वाघाड ५३९, ओझरखेड ८९८, पुणेगाव १८२, तिसगाव ११६, भावली ३८१, मुकणे २६९१, वालदेवी ७९५, कडवा ५४९, नांदुरमध्यमेश्वर २५३, भोजापूर ५४, चणकापूर १०२६, हरणबारी ४७४, केळझर १६७, नागासाक्या ००, गिरणा ६०९३, पुनद १०१७, माणिकपुंज ६५.
टॅंकरची स्थिती
तालुका संख्या
नांदगाव ४९
येवला ३५
मालेगाव २३
चांदवड २२
बागलाण १८
देवळा १४
सिन्नर ०९
The post टंचाईच्या झळा : नाशिकमध्ये अवघा ४१ टक्के जलसाठा; टँकर १७० वर appeared first on पुढारी.