रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगामुळे पुणे-इंदूर महामार्गही ठप्प

अन्न महामंडळ pudhari.news

नाशिक (मनमाड): पुढारी वृत्तसेवा
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले भारतीय अन्न महामंडळाचे धान्य गोदाम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. गोदामामधून धान्य घेण्यासाठी येणारे शेकडो ट्रक रस्त्यावर थांबत असल्याने शहरातील वेगवेगळ्या रस्त्यासह पुणे-इंदूर महामार्गांवर रोज वाहतुकीची कोंडी होत आहे. एफसीआय गेट ते पुणे-इंदौर महामार्गावर स्मशानभूमीपर्यंत ट्रकच्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

अन्न महामंडळाचे शहरात ब्रिटीशकालीन गोदाम आहे. तब्बल 265 एकरावर असलेल्या गोदामात 32 सायलो आणि 125 पेक्षा जास्त गोदाम असून त्यात हजारो मेट्रिक टन धान्य साठवले जाते. पंजाब, हरियाणा यासह इतर राज्यातून रेल्वेव्दारे गहू आणि तांदूळ आणले जाते. ते धान्य येथील गोदामात साठविले जाते. त्यानंतर शेकडो ट्रकच्या माध्यमातून राज्यातील वेगवेगळ्या भागात रेशन दुकानांवर धान्य पुरवठा केला जातो. धान्य घेण्यासाठी रोज येणारे शेकडो ट्रक एफसीआय गेटपासून थेट शहरातील वेगवेगळे रस्ते आणि पुणे-इंदूर महामार्गावर उभे केले जातात. ज्या रस्त्यावर ट्रक उभे केले जातात, त्याच रस्त्यावर शाळा, बँक, उपजिल्हा रुग्णालय यासह अनेक दुकाने आहेत. परिणामी जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना रस्त्यावरुन चालावे लागते. बाजारपेठ, बँका, रुग्णालयामध्ये जाणाऱ्या नागरिकांवर सुध्दा हीच वेळ आली आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशव्दारासमोर ट्रक उभे केले जात असल्याने रुग्णवाहिका रुग्णालयात जाऊ शकत नाही.

विशेष म्हणजे ज्या रस्त्यावर ट्रकची दुर्तफा रांग लागते, त्या मार्गांवर उपजिल्हा रुग्णालय,बँका,शाळा आहेत. परिणामी वाहतुकीच्या कोंडीत अनेकदा शाळांच्या बसेसही अडकून पडत आहेत. शाळेत जाताना विद्यार्थ्यांना देखील जीव मुठीत घेऊन जावे लागते. त्यामुळे एफसीआयने ट्रकसाठी त्यांच्या गोडाऊनच्या मैदानात पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे

आंदोलनचा इशारा
एफसीआयच्या ट्रकमुळे वाहतुक कोंडी होत असून याची दखल घेऊन भारतीय अन्न महामंडळाने ट्रक पार्किंगची व्यवस्था त्यांच्या हद्दीत करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा रिपाईचे गंगाभाऊ त्रिभुवन, गुरु निकाळे यांनी दिला आहे.

The post रस्त्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगामुळे पुणे-इंदूर महामार्गही ठप्प appeared first on पुढारी.