येवल्यात कांदा लिलाव सुरू करण्यावरून राडा, दगडफेकीत शेतकरी जखमी

येवला कृषी उत्पन्न बाजारसमिती,www.pudhari.news

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- बाजार समितीत बंद असलेल्या कांदा लिलावाबाबत कोणताही तोडगा निघत नसल्याने शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील समझोत्यानुसार खासगी जागेत कांदा लिलाव सुरू करण्यावर एकमत झाले. मात्र, कांदा लिलाव सुरू करण्यावरून हमाल मापारी गट आणि शेतकऱ्यांत राडा झाला. यावेळी एका अज्ञाताने केलेल्या दगडफेकीत एक शेतकरी जखमी झाला तर चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली.

येवला बाजार समितीत नोंदणीकृत व्यापारी व हमाल मापाऱ्यांच्या वादामुळे लिलाव बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे बाजार समितीच्या वतीने लिलाव सुरू करण्यासाठी संबंधितांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला संचालक मंडळासह व्यापारी प्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधी व हमाल मापारी उपस्थित होते. बाजार समितीच्या वतीने जैसे थे परिस्थिती ठेवून लिलाव सुरू करण्यात यावे, असा प्रस्ताव देण्यात आला. मात्र, व्यापारी संघटनेला हा प्रस्ताव मान्य न झाल्याने बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यानंतर खासगी जागेत कांदा खरेदी करता येईल का? याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र, प्रहार संघटना व विविध शेतकरी संघटनांनी याला विरोध केला. त्यानंतर शेतकरी व व्यापारीवर्गाने एकमताने येवला – मनमाड मार्गावरील खासगी जागेत कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, लिलाव सुरू करण्याच्या कारणावरून हमाल मापारी गट आक्रमक झाला. त्यानंतर अज्ञाताने केलेल्या दगड फेकीत नाटेगाव येथील शेतकरी डोक्यास दगड लागल्याने जखमी झाला.

पत्रकारांना धक्काबुक्की

यावेळी घटनेचे चित्रीकरण करत असलेल्या एएनआय वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे व छायाचित्रकार पत्रकार दीपक सोनवणे यांना जमावाने धक्काबुक्की केली. त्यानंतर तातडीने पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. शहर पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. सकाळी झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने तहसीलदार आबा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा –

The post येवल्यात कांदा लिलाव सुरू करण्यावरून राडा, दगडफेकीत शेतकरी जखमी appeared first on पुढारी.