ठाकरेंवर निष्ठा तर, बंडखोरीची गरज काय?

विजय करंजकर www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे माजी जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांची भूमिका विसंगत असल्याचा आरोप करत उध्दव ठाकरेंवर निष्ठा असल्याचे म्हणत असाल तर बंडखोरीची गरज काय, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी करंजकर यांनी केला आहे.

उमेदवारी ऐनवेळी कापली गेल्याने नाराज असलेले ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख करंजकर यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. त्यांच्या बंडखोरीचा महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना करंजकर यांनी व्यक्त केलेली भूमिकाही ठाकरे गटाला बोचणारी आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बडगुजर यांनी उमेदवारी न मिळाल्याने करंजकर यांनी बंडखोरी करण्याची भूमिका घेणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बडगुजर म्हणाले, अनेक पक्षांच्या मुख्य नेत्यांना करंजकर भेटले आहेत. आज त्यांनी स्वतः कबुली दिली की ‘मातोश्री’वरून मला बोलवणे आले होते. त्यांनी राजकीय भूमिका प्रांजळपणे मांडली पाहिजे. तुम्हाला कुठल्या पक्षाकडे जायचे आणि कुठे थांबायचे हे त्यांनी स्पष्ट करावे, उद्धव ठाकरेंवर निष्ठा आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे दुसऱ्या पक्षांच्या नेत्याला भेटायचे यामध्ये विसंगती दिसून येते आहे. त्यांच्या मनाची संभ्रमावस्था सांगून जाते की, काहीतरी वेगळे चालले आहे, अशी टीका बडगुजर यांनी केली. भगूरचे काही पदाधिकारी आणि नगरसेवक त्यांच्यासोबत असू शकतात. मनाेभूमिका स्पष्ट न केल्याने आजही ते बांधावर आहे. इकडे जायचं का आता बाजूला झुकायचे यात त्यांची संभ्रमावस्था आहे. त्यांना कुठे जायचंय ते कळत नाही. त्यांनी चुकीचा निर्णय घेऊ नये, योग्य तो सन्मान पक्षात आहे. राजकीय परिस्थितीमुळे काही बदल करावे लागले आहेत, असेही बडगुजर यांनी नमूद केले.

हेही वाचा –