दिंडोरीत जनरलचे मतदान ठरणार निर्णायक, हे तीन प्रश्न महत्वाचे…

भारती पवार, भास्कर भगरे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये निफाड, चांदवड, येवला आणि नांदगाव तालुक्यातील सर्वसाधारण गटाचे मतदान निर्णायक ठरण्याचा आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे यंदा देखील हिच री पुढे ओढली जाणार असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.

लोकसभा मतदारसंघांची २००८ मध्ये पुनर्रचना झाल्यानंतर दिंडोरी हा आदिवासींंसाठी राखीव मतदारसंघ म्हणून उदयास आला. या मतदारसंघामध्ये कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड, नांदगाव, चांदवड आणि येवला अशा आठ तालुक्यांच्या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश झाला आहे. चांदवड, निफाड, येवला, नांदगाव, कळवण-सुरगाणा, पेठ-दिंडोरी यांचा समावेश यामध्ये आहे. आदिवासींसाठी राखीव असलेला मतदारसंघ जरी म्हटला गेला तरी मुळात या मतदारसंघातील मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मतदार आदिवासी आहेत. आदिवासींच्या महादेव कोळी, कोकणा तसेच ठाकूर अशा अनेक जातींचा यामध्ये समावेश होतो.

या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये माळी, धनगर, वंजारी अशा माधव पॅटर्नचा जवळपास २५ ते ३० टक्के मतदार आहेत. फक्त मराठा समाजाचे यामध्ये जवळपास ३० ते ३५ टक्के मतदार असल्याचे गेल्या काही निवडणुकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. तसेच एससी घटकाचे ५ ते ७ टक्के मतदार यामध्ये असल्याचे दिसून येते. यामध्ये देखिल या मतदारसंघाचा पूर्व भाग असलेल्या मनमाड, नांदगाव, येवला या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत. इतर सर्वसाधारण मतदारांचा टक्का हा २० ते २५ एवढा आहे.

आताच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण मतदार हा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात असलेल्या कांदा, शेतकरी आणि पाण्याचा महत्वाचा प्रश्न कायमस्वरुपी आहे. कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकरी आणि कांदा व्यापारीवर्गाचा रोष, हर घर जल योजनेच्या माध्यमातून पाईपलाईन झाल्या मात्र, पाण्याचा पत्ताच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांना मतदारांसमोर जाताना त्यांचे मुलभूत प्रश्नांची उत्तरे घेऊन जावे लागणार आहे.

लढत चौरंगी

सद्यस्थितीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहे. भारतीय जनता पक्षातर्फे विद्यमान खासदार तसेच केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार तर महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे यांनी उमेदवारी अर्ज भरले आहे. सलग तीन वेळा खासदार असलेल्या हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारी करत ट्विस्ट आणला आहे. आधी नाही म्हणणारे जे. पी. गावित यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा –