मियावाकी प्रकल्प : मनपा शिक्षकांनी घेतला २,१८७ रोपांचा बळी

नाशिक : सतीश डोंगरे

ज्ञानाची गोष्ट असो, चांगला माणूस होण्याची गोष्ट असो वा चांगल्या संस्कारांची गोष्ट ‘शिक्षक’च या गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनावर रुजवितात. मात्र, शिक्षकच आपल्या कर्तव्यापासून भरकटले, तर… होय, महापालिकेच्या नऊ शाळांमध्ये ‘मियावाकी’ प्रकल्पा अंतर्गत लागवड करण्यात आलेल्या तब्बल २,१८७ रोपांचा निव्वळ शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे वर्षभराच्या आत बळी गेल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे ही रोपे जगविण्याचा या शिक्षकांनी सामंजस्य करार (एमओयू) केला होता.

सक्सेस ग्लोबल फाउंडेशनमार्फत महापालिकेच्या नऊ शाळांमध्ये मियावाकी फॉरेस्ट प्रकल्पा अंतर्गत मुंबईस्थित शिमात्सू एॅनॅलिटिक प्रा. लि. कंपनीच्या सीएसआर निधीतून जैवविविधतेचे महत्त्व सांगणाऱ्या तब्बल २,१८७ रोपांची साधारणत: वर्षभरापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर लागवड करण्यात आली होती. कंपनीच्या व्यवस्थापकांनी दि. १४ सप्टेंबर २०२२ रोजी तत्कालीन शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी सुनीता धनगर यांना पत्र लिहून या प्रकल्पासाठी परवानगी मागितली होती. धनगर यांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविताना नऊही शाळांच्या मुख्याध्यापकांकडून रोपांची देखभाल करण्याबाबत सामंजस्य करार करून घेतला होता.

तब्बल ३६ लाख रुपये खर्चून या रोपांची लागवड केली गेली. यावेळी सक्सेस ग्लोबल फाउंडेशनने अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने रोपांची लागवड करताना, त्यांच्यापर्यंत पाणी कसे पोहोचणार, याची व्यवस्था केली. प्रसंगी काही शाळांमध्ये थेट पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइन टाकली होती. प्रत्येक रोपाच्या पायथ्याशी ड्रीप उपलब्ध करून दिले होते. केवळ पाण्याचा व्हॉल्व्ह सुरू-बंद करणे एवढीच जबाबदारी शिक्षकांवर दिली होती. मात्र, अशातही शिक्षकांनी ही जबाबदारी पार पाडली नसल्याने ही सर्व रोपे जळून गेली आहेत. शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळेच ही रोपे जळाल्याचा आरोप फाउंडेशनकडून केला जात आहे.

आता त्या ठिकाणी जळालेली रोपे

या शाळांमध्ये वृक्षलागवड

१) मनपा शाळा क्र. ४७ : टाकळीगाव, नाशिकरोड

२) मनपा शाळा क्र. २५ : अशोकनगर, सातपूर

३) मनपा शाळा क्र. १ : माध्यमिक विद्यालय, म्हसरूळ

४) मनपा शाळा क्र. ३३ : महादेववाडी, सातपूर

५) मनपा शाळा क्र. ८६, ८७ : माध्यमिक विद्यालय, पाथर्डी गाव

६) मनपा शाळा क्र. ४३ : काठे गल्ली, पूर्व विभाग

७) मनपा शाळा क्र. २४ : विश्वासनगर, सातपूर

८) मनपा शाळा क्र. १४,१५ : मखमलाबाद गाव, पंचवटी

९) माध्यमिक विद्यालय : शिवाजीनगर, सातपूर

काठे गल्ली शाळेत हिरवळ

मनपाच्या नऊ शाळांपैकी काठे गल्ली येथील शाळा यास अपवाद ठरली. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी ही रोपे जगविण्यासाठी प्रयत्न केल्याने या ठिकाणी हिरवळ बघावयास मिळते. सध्या ही रोपे सात ते आठ फूट उंच झाली असून, या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडतो. इतर शाळांमध्ये मात्र, रोपे पूर्णपणे जळाली असून, त्या ठिकाणी सपाट मैदान झाल्याचे दिसून येते.

काय आहे मियावाकी प्रकल्प

जपानमधील अकिरा मियावाकी या वनस्पती शास्त्रज्ञाने जंगलनिर्मितीची नवी पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीनुसार अनेक देशांमध्ये स्थानिक, देशी वृक्षांच्या रोपांची निवड करून यशस्वीरीत्या जंगलनिर्मिती केली जाते. हाच प्रयोग या शाळांमध्ये करण्यात आला होता. मियावाकी पद्धतीनुसार दोन गुंठे जागेत तब्बल २४३ रोपांची लागवड केली जाते.

शहराच्या चहुबाजूने जैवविविधतेचे महत्त्व दर्शवणाऱ्या दोन हजारांहून अधिक झाडांचे संवर्धन होऊन, नाशिककरांसाठी ऑक्सिजन फॅक्टरी निर्माण व्हावी, हा या प्रकल्पाचा मूळ हेतू होता. तसेच या ठिकाणी पक्ष्यांना निवारा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना देशी झाडांचे निरीक्षण करून त्यांचे महत्त्व जाणून घेता यावे, हीदेखील आमची भावना होती. दुर्दैवाने रोपांकडे दुर्लक्ष केले गेल्याने, प्रकल्पाचा मूळ हेतू साध्य होऊ शकला नाही.

– नितीन सोनवणे, अध्यक्ष, सक्सेस ग्लोबल फाउंडेशन

प्रशासन अधिकाऱ्याची अनभिज्ञता

शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील यांना विचारले असता, त्यांनी याविषयी अनभिज्ञता दर्शविली. तसेच याबाबत मी फोनवर काहीही बोलू शकत नाही. कोणत्या कंपनीने हा उपक्रम राबविला?, त्यांची अडचण काय? असे प्रश्न उपस्थित करीत, त्यांनी उपक्रम राबविणाऱ्या कंपनीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

हेही वाचा :

The post मियावाकी प्रकल्प : मनपा शिक्षकांनी घेतला २,१८७ रोपांचा बळी appeared first on पुढारी.