नाशिक : वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक

वाहनांची तोडफोड www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जुने नाशिक परिसरात वाहनांची तोडफोड करून दहशत पसरवणाऱ्या टोळीतील पाच जणांना भद्रकाली पोलिसांनी अटक केली. या संशयितांना रविवारी (दि. ३) न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. कॉलेज रोड येथे स्नूकर खेळताना झालेल्या वादातून टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणीभद्रकाली पोलिस ठाण्यात नऊ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

शनिवारी (दि. २) रात्री 9 च्या सुमारास भद्रकाली परिसरातील कसाई वाडा व चौक मंडई परिसरात दोन टोळक्यांनी धुमाकूळ घातला होता. काही मिनिटांतच टोळक्याने परिसरातील दुचाकी, चारचाकी व व्यावसायिक वाहनांची तोडफोड करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयितांची धरपकड केली. आजम हबीब कुरेशी, फहीम शकील कुरेशी, सलमान शकूर कुरेशी, आवेश अल्ताफ शेख आणि फरीद मोबिन कुरेशी या संशयितांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने सोमवार (दि. ४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. भद्रकाली पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार दीपक रेहेरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन्ही गटांतील नऊ संशयितांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांचा वाद तोडफोडीस कारणीभूत

कॉलेजरोड परिसरातील एका स्नूकर पार्लरमध्ये दोन्ही टोळक्यांतील सदस्य स्नूकर खेळत होते. त्यावेळी तेथे दोघांचा वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन रात्रीतील तोडफोडीत झाले. शनिवारी रात्री 8.45 च्या सुमारास एक टोळी चौक मंडई येथील दुसऱ्या टोळीतील सदस्याच्या घराखाली आली. त्यांनी काही क्षणांत वाहनांची तोडफोड केली. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या टोळीनेही दुसऱ्या परिसरात वाहनांची तोडफोड केली. संशयितांनी लाठी, दांडके, विटा, दगडांचा वापर करीत तोडफोड केल्याचे उघड झाले.

सीसीटीव्ही, माहितीच्या आधारे संशयितांची धरपकड

घटना घडल्यानंतर पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, विजय ढमाळ यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांची धरपकड केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार संशयितांची ओळख पटवून त्यांना पकडले. तसेच फरार संशयितांच्या मागावरही पोलिस पथके आहेत. रविवारीही पोलिसांनी परिसरात तळ ठोकला होता.

कॉलेजरोड परिसरात स्नूकर खेळताना दोन गटांतील सदस्यांचे वाद झाले होते. त्यातील एक जण घटनास्थळी राहात असल्याने तिथे जमल्यावर एका गटाने काही वाहने फोडली. त्याचप्रमाणे दुसऱ्या गटानेही नुकसान केले. पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे. संशयितांवर कठोर कारवाई प्रस्तावित करणार आहोत.

– किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

हेही वाचा 

The post नाशिक : वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक appeared first on पुढारी.