नाशिक : पुढारी वृत्तसेवा- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आगामी नाशिक दौऱ्याच्या नियोजनाच्या निमित्ताने गोदाघाटावर पाहणीसाठी आलेल्या खासदार विनायक राऊत व वरुण सरदेसाई यांच्यासमोर शिंदे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी रामकुंड परिसरात जोरदार घोषणाबाजी केल्याचा प्रकार घडला. दरम्यान, पंचवटी पोलिसांनी घोषणा देणाऱ्या युवा सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात पाचारण करत ‘समज’ दिल्याचे वृत्त आहे.
१९९५ नंतर प्रथमच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे राज्यव्यापी अधिवेशन येत्या २३ जानेवारीला नाशिकमध्ये होत आहे. त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २२ जानेवारीला नाशकात दाखल होणार असून, ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहेत. त्याचप्रमाणे गोदाघाटावर त्यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. २३ तारखेला सकाळी ११ वाजता सातपूरमधील हॉटेल डेमोक्रसी येथे शिवसेनेचे अधिवेशन होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या दौऱ्याची ठाकरे गटाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यानिमित्ताने खा. विनायक राऊत व ठाकरे गटाच्या युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई बुधवारी (दि.१७) नाशिक दौऱ्यावर आले होते.
पाथर्डी फाटा येथील आर. के. लॉन्स येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर खा. राऊत, सरदेसाई, डी. जी. सूर्यवंशी, दीपक दातीर आदी गोदाघाटावर दाखल झाले. दरम्यान, शिंदे गटाच्या युवा सेनेतर्फे नाशकात बुधवारी युवा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. त्यासाठी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरदेसाई व पालकमंत्री दादा भुसे हेदेखील नाशिकमध्ये आले होते. पालकमंत्री भुसे यांनी या कार्यक्रमानंतर गोदाघाटाचा पाहणी दौरा केला. दोन्ही गटांचे पदाधिकारी गोदाघाटावर एकाचवेळी पोहोचले. यावेळी शिंदे गटाच्या युवा सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. ठाकरे व शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचाही प्रकार घडला. त्यामुळे रामकुंड परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांकडून ‘समज’
दोन्ही गटांच्या नेत्यांनी शांततेची भूमिका घेतल्यामुळे तसेच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र, यानंतर पंचवटी पोलिसांनी शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी योगेश बेलदार, योगेश म्हस्के, दिगंबर नाडे, रूपेश पालकर आदींना पोलिस ठाण्यात पाचारण करत ‘समज’ दिल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :
- अविवाहित मुलीला ‘घरगुती हिंसाचार’ कायद्यांतर्गत पोटगीचा अधिकार, वय आणि धर्माचा संबंध नाही : उच्च न्यायालय
- PM Modi Issued Postal Stamps: रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा स्मरणार्थ PM मोदींच्या हस्ते ‘टपाल तिकिट’ जारी, जगभरातील तिकिट पुस्तकाचेही प्रकाशन
The post ठाकरे गटाच्या नेत्यासमोर शिंदेंच्या युवा सेनेची घोषणाबाजी appeared first on पुढारी.