डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन इरिगेशनला प्रदान

जळगाव,www.pudhari.news

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा- सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्म शताब्दी सोहळ्यानिमित्त संगमनेर येथे रविवारी हरित क्रांतिचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारला.

यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे होते तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला, कर्नाटकचे मंत्री एच.के. पाटील, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, आमदार जितेंद्र आव्हाड, भास्कर जाधव, माजी विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार समतेचे तत्वज्ञान जपणारे माजी आमदार उल्हास दादा पवार तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्था पुरस्कृत सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूर चे आमदार पी.एन.पाटील यांना प्रदान करण्यात आला.

सत्कारास उत्तर देताना अशोक जैन यांनी सांगितले की, आमच्या जैन इरिगेशन कंपनीला पुरस्कार देऊन सन्मानित केले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून ऋणी आहे आणि नम्रपणे हा पुरस्कार स्वीकारून प्रस्तुत पुरस्कार आमच्या जैन इरिगेशन कंपनीचे संस्थापक अध्यक्ष, आमचे परमपूज्य पिताजी श्रद्धेय भवरलालजी जैन आणि त्यांच्या समवेत परिश्रम घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना अर्पण करतो. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे भाऊसाहेब थोरात, स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे, आमचे वडील भवरलालजी हे तिघेही शेतकरी कुटुंबात जन्मले आणि तिघांनीही कृषी क्षेत्रातील कामकाजावर आधारित उद्योगक्षेत्रात काम करून शेतकऱ्यांच्या कल्याणाची, प्रगतीची, उन्नतीची चिंता वाहून त्यासाठी आयुष्यभर कष्ट घेतले. स्वर्गीय भाऊसाहेब थोरात आणि आमच्या वडिलांनी शेतमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी केली तर अण्णासाहेबांनी केंद्रात 15 वर्ष शेती खात्याचे राज्यमंत्रीपद सांभाळून या देशाच्या कृषी क्षेत्राला धोरणात्मक वळण लावण्याचा प्रयत्न केला आणि वैचारिक मार्गदर्शनही केले.

या पुरस्काराची एक लाख रक्कम न स्वीकारता त्यात जैन इरिगेशन सिस्टिम्स ली च्या वतीने दहा लाख असे एकूण 11 लाख रुपये बाळासाहेब थोरात यांना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देण्याचे अशोक जैन जाहीर केले.

हेही वाचा :

The post डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार जैन इरिगेशनला प्रदान appeared first on पुढारी.