श्री शिवमहापुराण कथेद्वारे धर्माचा प्रचार-प्रसार : खासदार श्रीकांत शिंदे

खासदार श्रीकांत शिंदे www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; श्री शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून पंडित प्रदीप मिश्रा हे सनातन हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसाराचे महान कार्य करत आहेत, असे गौरवद‌्गार खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. पाथर्डी फाटा येथील दोंदे मळ्यामधील श्री शिवमहापुराण कथेला खा. शिंदे यांंनी शुक्रवारी (दि. २४) उपस्थित राहात पं. मिश्रा यांंचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भक्तांशी संवाद साधला. नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो. पण आज श्री शिवमहापुराण कथेनिमित्त उपस्थित जनसमुदाय बघताना कुंभमेळ्याची अनुभूती झाल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

पं. मिश्रा यांचे दर्शन घेण्याचे भाग्य मला दुसऱ्यांदा लाभल्याचे सांगताना खा. शिंदे यांनी कथेद्वारे हिंदुत्वाची भावना दृढ होत असल्याचा विश्वास व्यक्त केला. पं. मिश्रा हे श्री शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून सनातन धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचे महान कार्य करत आहेत. यामुळे सुसंस्कृत पिढी निर्माण होण्यास मदत मिळत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. यावेळी आपल्या मतदारसंघात श्री शिवमहापुराण कथेचे आयोजन करावे, अशी विनंती खा. शिंदे यांनी पं. मिश्रा यांना केली.

श्रीराम मंदिराचे स्वप्न सत्यात उतरल्याचा आनंद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाचा प्रचार-प्रसार करत आहेत. राज्य शासनाने ठिकठिकाणच्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतल्याची माहिती खा. शिंदे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येमधील श्रीराम मंदिराचे निर्माण कार्य वेगाने सुरू आहे. जानेवारीमध्ये श्रीराम मंदिराचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला असून, या माध्यमातून आपले श्रीराम मंदिराचे स्वप्न सत्यात उतरणार असल्याचा आनंद असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post श्री शिवमहापुराण कथेद्वारे धर्माचा प्रचार-प्रसार : खासदार श्रीकांत शिंदे appeared first on पुढारी.