‘सनातन’ धर्मासाठी एकत्र यावे : पं. प्रदीप मिश्रा

प्रदीप मिश्रा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; भारतीय संस्कृती आणि सनातन धर्म हे अतूट नाते आहे. सनातन धर्माला आपल्या संस्कृतीत विशेष असे महत्त्व आहे. त्यामुळे साधू-महंत व महात्म्यांनी सनातन धर्मातील वाद टाळतानाच एकत्र येत धर्म बळकटीसाठी प्रयत्न करावे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय कथाकार भागवत भूषण पं. प्रदीप मिश्रा (सिहोरवाले) यांनी केले.

पाथर्डी फाटा येथील दोंदे मळा येथे आयोजित शिवमहापुरण कथेमध्ये शुक्रवारी (दि.२४) त्यांनी चाैथे पुष्प गुंफले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष उपस्थिती लाभली. पालकमंत्री दादा भुसे हेदेखील यावेळी उपस्थित होते.

पं. मिश्रा म्हणाले, मनुष्य हा जीवनभर सुखाच्या मागे धावतो. आजच्या मानवी स्वभावानुसार घर, वाहन, पैसा व नातेवाईक ही सुखाची परिभाषा बनली आहे. मात्र, आपला जन्मच नश्वर असल्याची भावना मनुष्यप्राणी विसरला आहे. त्यामुळे सुखी जीवनाच्या कल्पनेमध्ये रममाण होणाऱ्या व्यक्तींना दु:खाच्या यातनांनाही सामाेरे जावे लागत असल्याचे प्रतिपादन पं. मिश्रा यांनी केले. मनुष्य जन्मात छोट्या-छोट्या गोष्टीत सुख शोधताना मिळालेल्या जीवनाचे सार्थक करावे. आपला वेळ सत्कर्मासाठी व्यतित करावा, असा सल्ला मिश्रा यांनी दिला.

पृथ्वी तलावावर जन्म घेणाऱ्या बाळासाठी आईचेच दूध महत्त्वाचे असते. तसेच जीवनाच्या शेवटच्या क्षणीदेखील भगवंताचे नामस्मरण करणे आवश्यक असल्याचे सांगत पं. मिश्रा यांनी सुखवस्तूंच्या मोहात अडकू नका. जीवन जगताना शर्ट-पॅन्टच्या एका खिशात कर्म आणि दुसऱ्या खिशात धर्माला स्थान द्यावे. सनातन धर्म बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मत मिश्रा यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे व सरोज अहिरे, अजय बाेरस्ते, आविष्कार भुसे, प्रवीण तिदमे, रंजन ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर व शिवभक्त उपस्थित होते.

आज समारोप

शिवमहापुराण कथेला चाैथ्या दिवशी शिवभक्तांची विक्रमी गर्दी झाली. आयोजकांकडून तीन ते साडेतीन लाख भाविक उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पाचदिवसीय कथामालेचा शनिवारी (दि.२५) समारोप होत आहे. यावेळी सकाळी ८ ते ११ यावेळेत कथा होणार आहे.

मुलांवर स्वप्न लादू नका

पालकांकडून होणाऱ्या शिक्षणाच्या अतिरिक्त सक्तीमुळे मुले आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत. त्यामुळे मुलांच्या कलाने घेताना त्यांच्यावर शिक्षणासाठीचा दबाव आणू नका, असा सल्ला पं. मिश्रा यांनी दिला. तसेच आपल्या क्षमतेपेक्षा दुप्पट शिक्षण त्यांना जरूर द्यावे. पण, ते देतानाच धर्म, संस्कार व भक्तीचा मार्गही त्यांना शिकवावा, असेही त्यांनी सांगितले.

.. तर महाराष्ट्र टॉपवर असता

महाराष्ट्र ही साधू-महंतांची भूमी आहे. महात्मा, साधू-महंतांनी केलेल्या भजन-कीर्तनामुळे ही भूमी सर्वश्रेष्ठ बनली आहे. अशा या भूमीवर आपला जन्म होणे ही सर्वश्रेष्ठ बाब असल्याचे पं. मिश्रा म्हणाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आज हयात असते तर आजच्या महाराष्ट्राचे चित्र वेगळे ठरले असते. त्यांच्यामुळे हे राज्य देशात टॉपवर पोहोचले असते, असे कौतुकोद्गार पं. मिश्रा यांनी काढले.

पंडित मिश्रा मधुर वाणी…

– मनुष्य शरीर व्यर्थ वाया घालवू नका

– जीवनामध्ये वेळेचा सदुपयोग करा

– धर्म कार्यासाठी जीवन खर्च करावे

– खोटया सुखात जीवनाचा आनंद शोधू नका

– ज्ञान हेच खरे सौंदर्य

– बारा ज्योतिर्लिंग, शंकराचार्यांचे चारपीठ हे बलस्थान आहे.

The post 'सनातन' धर्मासाठी एकत्र यावे : पं. प्रदीप मिश्रा appeared first on पुढारी.