नाशिक : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारला पदभार

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- संपूर्ण महाराष्ट्रात नाशिकची प्रतिमा मलीन करणाऱ्या ड्रग्ज प्रकरणाचा शेवट करणार असल्याचा निर्धार पुणे शहर पोलिस सहआयुक्त पदावरून नाशिक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेले नवनियुक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केला. त्यांनी शुक्रवारी (दि. २४) पदभार स्वीकारत मुंबई, पुणे आणि नाशिक पोलिसांच्या कारवायांचे कौतुक केले. मात्र, लॉजिकल एण्डपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही स्पष्ट केले. तसेच नाशिक शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोअर पोलिसिंगवर भर देणार असल्याचेही सांगितले.

कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच अवघ्या ११ महिन्यांत अंकुश शिंदे यांची बदली केली गेली. त्यांना ड्रग्ज प्रकरण भोवल्याची चर्चा आहे. दरम्यान, नवे पोलिस आयुक्त कर्णिक यांच्यासमोर ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे. याविषयी आयुक्त कर्णिक म्हणाले, ड्रग्ज प्रकरणी जे गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा तपास होऊन जे पुरावे समोर आले आहेत, त्यावर काम करणार आहे. या प्रकरणाचा शेवट करण्याचा माझा प्रयत्न असेल. दरम्यान, पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचे मी माझे भाग्य समजतो. चांगल्या कामगिरीतून नाशिककरांना दिलासा देण्याचा माझा प्रयत्न असेल. कोअर पोलिसिंग करण्यावर भर देतानाच नागरिकांच्या तक्रारींना पोलिसांचा योग्य प्रतिसाद देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी ग्रामदेवता कालिकामातेचे दर्शन घेतले. आपण ज्या ठिकाणी जातो, तेथील ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन कामाला सुरुवात करीत असल्याचे आयुक्त कर्णिक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याप्रसंगी राज्य गुप्तवार्ता आणि व्हीआयपी सुरक्षा विशेष पोलिस महानिरीक्षकपदी बदली झालेले माजी आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार सोडल्याची स्वाक्षरी केली. यावेळी उपायुक्त किरणकुमार चव्हाण, प्रशांत बच्छाव, चंद्रकांत खांडवी, मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे हे अधिकारी आयुक्तांच्या दालनात उपस्थित होते.

बदली हा शासकीय नोकरीचा भाग आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी बदली झाली, त्या ठिकाणी मी जाणार. नाशिक हे खरोखरच उत्तम शहर असून, नाशिकचे लोक प्रेमळ आणि सकारात्मक आहेत. गेल्या ११ महिन्यांचा कालावधी माझ्या अनुभवात भर घालणारा असून, जीवन सकारात्मक करण्यास फायदेशीर ठरेल, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. तसेच नाशिककरांच्या समस्या बऱ्यापैकी हातळण्याचा प्रयत्न केला. शहर पोलिस दलाने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवले. याविषयी वरिष्ठांकडे ब्रिफ करणार आहे.

– अंकुश शिंदे, माजी पोलिस आयुक्त, नाशिक शहर

‘व्हिजिबल आणि स्ट्राँग’ या दोन्ही पोलिसिंगमध्ये फरक आहे. प्रत्येक मोहिमेत, कारवाई व निर्णयात नागरिकांच्या प्रतिक्रिया आयुक्तालयापर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे. त्यानुसार नागरिककेंद्रित पोलिसिंगवर भर देण्याचा प्रयत्न करणार आहे.

– संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त, नाशिक शहर

ग्रामदेवतेच्या दर्शनाने प्रारंभ

आयुक्त कर्णिक हे नाशिकमध्ये दाखल होताच त्यांनी ग्रामदेवता कालिकामातेचे दर्शन घेतले. यावेळी श्री कालिका मंदिर ट्रस्टच्या वतीने संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. खजिनदार सुभाष तळाजिया यांनी त्यांचा सत्कार केला. आयुक्तांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. याप्रसंगी दत्ता पाटील, सुरेंद्र कोठावळे, रामा पाटील, अजय भोसले, सुरेंद्र कोठावळे, युवराज पत्की आदी उपस्थित होते. दरम्यान, तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी गोदावरी नदीचे पूजन केले होते.

कमी मनुष्यबळात, उत्तम कामगिरी

नाशिक शहर पोलिस दलात मनुष्यबळाची कमतरता आहेच, पण आहे त्या मनुष्यबळात उत्तम कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असेल. शहरातील गुन्हेगारी नियंत्रणासह वाहतूक नियोजन, वाहतूक पोलिसांच्या समस्या निवारणासह त्यांच्यासंदर्भात येणाऱ्या तक्रारीही दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पुढील दोन-तीन दिवसांत आयुक्तालयाच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतल्यानंतर पुढील कार्यवाहीचा निर्णय घेणार असल्याचे आयुक्त कर्णिक यांनी स्पष्ट केले.

नव्या पोलिस आयुक्तांसमोरील आव्हाने

– एमडी ड्रग्जनिर्मितीचे केंद्रबिंदू असलेल्या नाशिकमधील टोळीची पाळेमुळे शोधून काढणे.

– ड्रग्ज प्रकरणातील आरोपींवर असलेल्या राजकीय वरदहस्तांचा छडा लावणे.

– आगामी मनपा, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे.

– शहरातील वाढत्या गुन्हेगारीला चाप लावणे.

– खून, चेनस्नॅचिंग, टोळीयुद्ध, अवैध धंद्यांचे रॅकेट शोधून काढणे.

– राजकारण्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्या पोलिसांना शोधून काढणे.

– नागरिकांमध्ये पोलिसांप्रति मैत्रीची भावना निर्माण करणे.

The post नाशिक : पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारला पदभार appeared first on पुढारी.