नाशिक : अखेर गंगापूर, दारणातून जायकवाडीला पाणी

दारणा धरण नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिकच्या गंगापूर व दारणा धरण समूहामधून अखेर जायकवाडीला ३.१४३ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाने त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. दोन्ही समूहातून लवकरच पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळे पाण्यावरून नाशिक विरुद्ध मराठवाडा असा सुरू असलेला वाद शमणार आहे.

अल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यासमोर पाणीटंचाईचे भीषण संकट उभे ठाकले आहे. मराठवाड्यातील अपुऱ्या पर्जन्यामुळे जायकवाडीत ४० टक्क्यांच्या आसपास साठा शिल्लक आहे. त्यामुळे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने ३० आॅक्टोबरला नाशिक व नगर जिल्ह्यांतून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश पारित केले होते. मात्र, महामंडळाच्या या आदेशावरून नाशिक व नगरमधून तीव्र भावना उमटल्या होत्या. तसेच दोन्ही जिल्ह्यांमधून उच्च न्यायालय तसेच सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यात आली होती. सर्वाेच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणातील हस्तक्षेप याचिकांच्या स्थगितीस नकार दिला आहे. त्यामुळे महामंडळाने पाणी सोडण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यानुसार मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नाशिकमधून ३.१४३ टीएमसी पाणी सोडण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत.

नाशिक आणि नगर जिल्ह्यांतील धरणांतून जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत उच्च न्यायालयातील याचिकांवर 5 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. तर सर्वाेच्च न्यायालयात १२ डिसेंबरला या प्रश्नी पुढील सुनावणीची तारीख आहे. या सुनावणी होण्यापूर्वीच नाशिकमधून पाणी सोडले जाणार आहे. दरम्यान, दारणा व गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सोडण्यासाठी जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाकडून आवश्यक ती उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच पाणीचोरी रोखण्यासह त्याचा अपव्यय टाळण्यावर भर देण्यात येत आहे.

पाण्यावरून नाराजीचा सूर

जायकवाडीसंदर्भात सर्वाेच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर पुढील सुनावणीसाठीची तारीख निश्चित आहे. तोपर्यंत पाणी सोडण्यात येणार नाही, अशी अटकळ बांधली जात होती. पण तत्पूर्वीच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या तोंडी आदेशावरून प्रशासनाने पाणी सोडण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे नाशिक व नगर जिल्ह्यांत तीव्र नाराजीचा सूर आहे.

The post नाशिक : अखेर गंगापूर, दारणातून जायकवाडीला पाणी appeared first on पुढारी.