निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिस दलात बदल्यांचे वारे

Police

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे वाहत आहेत. सेवेचा कालावधी पूर्ण केलेल्या व स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या महिनाभरात होणार आहेत. त्यामुळे शहरातील सहा ते सात प्रभारी पोलिस निरीक्षकांची बदली होण्याची शक्यता वर्तवली जात असून, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी पाेलिस विभागावर असते. येत्या काही दिवसांपासून बंदोबस्त, व्हीआयपी दौरे, वाहतूक नियोजन, गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई आदी जबाबदाऱ्या पोलिसांवर येणार आहेत. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पोलिस दलात बदल्या होणार आहेत. त्यामुळे नाशिक संवर्गात तीन ते सहा वर्षे कार्यकाळ पूर्ण केलेल्या व स्थानिक असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या अपेक्षित आहेत. अशा अधिकाऱ्यांची यादी प्रशासनाने मागवली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांत पोलिस दलात बदल्यांचे वारे वाहतील. शहरातील प्रभारी पोलिस निरीक्षकांची बदली होणार असल्याने तेथे कोणाची नियुक्ती होते याकडे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांचे, स्थानिक राजकीय पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्याही बदल्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यांची बदली अपेक्षित

पोलिस आयुक्तालयातील कार्यकारी पदांवर नियुक्त पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांची शक्यता आहे. त्यानुसार भद्रकाली, अंबड, इंदिरानगर, उपनगर व नाशिकरोड पोलिस ठाण्यात काही महिन्यांपूर्वी शहरात बदलून आलेले निरीक्षक कार्यरत आहेत. तर म्हसरूळचे निरीक्षक राजू पाचोरकर, पंचवटीचे अनिल शिंदे, आडगावचे गणेश न्याहदे, गंगापूरचे श्रीकांत निंबाळकर, सरकारवाडाचे दिलीप ठाकूर, मुंबई नाक्याचे युवराज पत्की, सातपूरचे पंकज भालेराव, देवळाली कॅम्पचे किरण चव्हाण हे निरीक्षक यापूर्वीपासून शहरात कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांची इतरत्र बदली हाेण्याची किंवा त्यांना अकार्यकारी पदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तर काही वरिष्ठ निरीक्षक हे सहायक आयुक्त पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असून, त्यांना पदोन्नती मिळाल्यास त्यांच्याही बदल्या होतील.

हेही वाचा ;

The post निवडणूक पार्श्वभूमीवर पोलिस दलात बदल्यांचे वारे appeared first on पुढारी.