डोबिंवली स्फोट प्रकरणातील कंपनी मालक नाशिकमधून ताब्यात

मालती प्रदीप मेहता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीत झालेल्या बॉयलर स्फोट दुर्घटनेप्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मालकास नाशिक शहरातील म्हसरुळ येथील मेहेरधाम परिसरातून ताब्यात घेतले आहे. मालती प्रदीप मेहता (७०) असे संशयित महिलेचे नाव आहे. नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट एकसह ठाणे पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केली.

डोंबिवली येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या अमुदान या केमिकल कंपनीत गुरुवारी (दि. २३) बॉयलरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला, तर ६५ पेक्षा जास्त कामगार गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत परिसरातील इतर कंपन्यांचेही नुकसान झाले. स्फोटामुळे तीन ते चार किलोमीटर परिसराला हादरा बसला, इमारतींचे नुकसान झाले तर आगीत कंपनी खाक झाली. या स्फोटाप्रकरणी कंपनीच्या मालकांसह इतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा झाल्यानंतर मुंबईतून संशयित मालती मेहता या नाशिकमध्ये आल्या. त्यांनी व्याहीच्या नणंदेकडे मुक्काम केला. ठाणे गुन्हे शाखेला त्यासंदर्भात माहिती मिळताच त्यांनी नाशिक आयुक्तालयास कळविले. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या पथकाने मालती मेहता यांचा शोध घेतला. गुरुवारी मध्यरात्रीपासून दोन्ही पथके त्यांच्या मागावर होती. शुक्रवारी (दि. २४) दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास संशयित मेहता यांना ताब्यात घेतले. ठाणे पोलिसांनी मेहता यांना अटक करुन डोंबिवलीत नेले. याप्रकरणी पुढील तपास ठाणे पोलिस करीत आहेत.

हेही वाचा –