नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसण्याचा इशारा देत लढाईच्या तिसऱ्या टप्यात महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यानुसार गुरुवारी (दि.८) जरांगे- पाटील नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान मंत्री छगन भुजबळ आणि जरांगे- पाटील यांच्यात शाब्दीक सामना रंगण्याची शक्यता आहे.
गुरुवारी सकाळी ७ वाजता ते बागलाण येथून दौऱ्याला सुरुवात करतील. यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांचा विविध ठिकाणी सत्कार होणार आहे. सर्वप्रथम दिंडोरी, वणी, कळवण, सटाणा, लोहोणेर-ठेंगोडा येथे स्वागत होइल. तर देवळा येथे ते शिवतीर्थाला अभिवादन करतील. कंधाणा फाटा येथे अहिल्याबाई देवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात ते सहभागी होतील. बागलाण येथे ग्रामदैवत यशवंतराव महाराज मंदिरात दर्शन घेऊन ते काही लोकांच्या ते गाठीभेटी घेणार आहेत. डांग्या मारुती, औंदाणे गाव, विरगाव, ताराबाद, अंतापूर येथे त्यांचे स्वागत केले जाणार आहे. ११ वाजताा साल्हेर किल्ला येथे आयोजित कार्यक्रमातही ते उपस्थित राहणार आहेत. या दौरात मराठा समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन श्रीराम पाटील, करण गायकर, विलास पांगारकर, नानासाहेब बच्छाव यांनी केले आहे.
येवला, इगतपुरीनंतर दिंडोरी दौरा
मनोज जरांगे-पाटील तिसऱ्यांदा नाशिक दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी त्यांनी जिल्ह्यातील उपोषणकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघात जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वर, इगतपूरी भागात जाहीर सभा घेतल्या होत्या. आता ते तिसऱ्यांदा नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
The post तिसऱ्यांदा नाशिक दौरा होत असून भुजबळ-जरांगे सामना रंगणार appeared first on पुढारी.