त्र्यंबकेश्वरमध्ये भेसळयुक्त पेढ्यांची विक्री; एफडीएची विक्रेत्यांवर कारवाई

त्र्यंबकेश्वर भेसळयुक्त पेढ्यांची विक्री, www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- त्र्यंबकेश्वर येथील मंदिर परिसरात भेसळयुक्त पेढा व स्पेशल बर्फीची सर्रासपणे विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईतून पुढे आली आहे. भेसळयुक्त मावासदृश स्पेशल बर्फीपासून पेढा व कलाकंद बर्फी तयार करून त्याची विक्री होत असल्याचे आढळून आले. भेसळयुक्त पेढा व बर्फी विक्री केली जात असल्याने, भाविकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयातर्फे धार्मिक स्थळांच्या यात्रेच्या ठिकाणी व येणाऱ्या उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता भेसळयुक्त, मिथ्याछाप अन्नपदार्थांवर कार्यवाही घेण्याबाबतची मोहीम हाती घेतली आहे. भाविकांना दर्जेदार व भेसळविरहीत अन्नपदार्थ मिळावेत याकरिता अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी (दि. १८) त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात अचानक कारवाई केली. अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार, योगेश देशमुख, प्रमोद पाटील व अश्विनी पाटील यांनी अचानक छापे टाकून तपास केला. यावेळी मे. भोलेनाथ स्विटस्, मेन रोड, त्रंबकेश्वर येथून एकूण ७८ किलो कुंदा (लूज), किंमत ३७ हजार ४४० रुपये, श्री नित्यानंद पेढा सेंटर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्रंबकेश्वर येथून स्विट हलवा (शाम) २२ किलो, किंमत ६ हजार ६०० रुपये तसेच हलवा (ग्वाल) १३ किलो किंमत ३ हजार ९०० रुपये, मे. भोलेहर प्रसाद पेढा प्रसाद भंडार, उत्तर दरवाजा, त्र्यंबकेश्वर येथून भेसळयुक्त पदार्थचे नमुने जप्त केले आहेत.

घेतलेले नमुने अन्न विश्लेषकास पाठविण्यात आले असून, अहवाल आल्यावर कायद्यानुसार उल्लंघनाबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल. भाविकांनी धार्मिकस्थळी प्रसाद म्हणून पेढे, बर्फी, मिठाई इत्यादी खरेदी करताना ते दुधापासून बनविले असल्याबाबत खात्री करून खरेदी करावी. तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांसंदर्भात तक्रार तसेच काही गोपनीय माहिती प्राप्त झाल्यास प्रशासनास कळवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा –