त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे

नितेश राणे

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात संदल मिरवणुकीदरम्यान अन्य धर्मीयांनी पायरीवर धूप दाखविण्याची कोणतीच परंपरा नाही, असा दावा आमदार नितीश राणे यांनी आज महाआरतीनिमित्त केला.

त्र्यंबकेश्वर येथील 13 मे रोजी झालेल्या मंदिर प्रवेशाच्या कथित घटनेनंतर मंगळवारी (दि. 23) आमदार नितेश राणे येथे महाआरतीसाठी आले होते. त्यांच्या समवेत आमदार तथा माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके उपस्थित होते. महाआरतीवेळी त्यांच्या समवेत त्र्यंबकेश्वर भाजपचे तालुकाध्यक्ष विष्णू दोबाडे, ॲड. श्रीकांत गायधनी आणि मयूरेश दीक्षित तसेच तेजस ढेरंगे, कैलास देशमुख, शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, प्रशांत बागडे, कुणाल उगले, सुयोग शिखरे,रामचंद्र गुंड, सागर गमे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. राणे म्हणाले की, आपण मंदिर विश्वस्तांशी बोललो आहे. तसेच स्थानिकांना विचारले असता संदल मिरवणुकीदरम्यान त्र्यंबकराजाला धूप दाखविण्याची परंपरा नसल्याचे त्यांनी आपणास सांगितले. आपण येथे एक हिंदू म्हणून महाआरतीसाठी आलो आहे. 13 मे च्या घटनेबाबत गैरसमज पसरवले जात आहेत व हिंदूंची बदनामी होत आहे. त्यासाठी मी ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्ट यांच्या इच्छेने येथे आलो. महाविकास आघाडी सरकार असताना मागच्या वर्षी ते युवक आत गेले व त्यांनी त्याच्या फेसबुकवर क्लिप टाकल्या. यावर्षी पुन्हा तोच प्रयोग त्यांना करायचा होता. मात्र, विश्वस्त मंडळाने तो प्रयोग हाणून पाडला. यासाठी विश्वस्त मंडळाने सीसीटीव्ही जाहीरपणे दाखवावा आणि बुरखे फाडावेत, असे आवाहन आ. राणे यांनी केले. मंदिरात कोण्याच्या येण्यावर आमचा आक्षेप नाही. मंदिरात तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर रांगेत उभे राहून आमच्या पद्धतीने घ्यावे, असेही ते म्हणाले.

13 मे रोजी हिरवे झेंडे घेऊन आलेल्या युवकांचा हेतू वेगळा होता. हा लॅंड जिहाद नावाचा प्रकार आता पुढे येत आहे. देवस्थानमध्ये हक्क दाखवायचा आणि काही दिवसांनी ते ताब्यात घ्यायचे. देशातील किल्ले अतिक्रमणाने ताब्यात घेतले आहेत. 13 मे रोजी मंदिर प्रवेशाचा आग्रह धरणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचा दावा राणे यांनी केला.

मटण, चिकनची दुकाने बंद करा

त्र्यंबकेश्वर शहर आणि परिसरात मटण, चिकन विक्री करणारी दुकाने आहेत. ती बंद करावीत. त्यामुळे पुढे मागे त्या जागा हिंदूंच्या राहणार नाहीत. त्र्यंबकेश्वर शहरात मांस, मच्छी आणि दारूविक्री करणारे दुकाने बंद करण्याचा नगरपालिकेने ठराव केला आहे. त्याची अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्र्यंबकेश्वर शहर आणि मंदिर परिसरात अतिक्रमणे वाढली आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे. त्र्यंबकेश्वर शहरातील जागांचे सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच गायरानांच्या व वनखात्याच्या जमिनीवर अतिक्रमण झाले आहेत. इतरधर्मीय व्यक्ती त्या प्रार्थनास्थळाच्या नावाने बळकावत आहेत, असा दावा राणे यांनी केला.

राऊत हिंदू राहिले नाही :

खा. संजय राऊत यांच्याबाबत बोलताना ते हिंदू राहिले नाहीत. त्यांची सुंता झाली आहे, असे ते म्हणाले. माध्यमांनी येथील चुकीची बातमी देऊन येथील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. नेत्यांनी आपण पहिले हिंदू आहोत हे लक्षात घ्यावे आणि मग वक्तव्य करावे, असे स्पष्ट केले.

सर्व आदिवासी हिंदूच : उईके

दरम्यान, माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी सर्व आदिवासी हिंदू आहेत. धर्मांतर करणारे आदिवासींची दिशाभूल करतात व आदिवासी संस्कृती नष्ट करतात, असा दावा केला. हिंदू महादेव कोळी यांना अनुसूचित जमातीचे दाखले दिले आहेत व येथून पुढे देण्यात येतील, असे स्पष्ट केले.

आ. नितेश राणे दर्शनासाठी येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. त्यांनी देवदर्शन करावे, मात्र येथील सलोख्याचे आणि एकोप्याचे वातावरण बिघडणार नाही व सामाजिक तेढ निर्माण होईल, असे प्रक्षभोक भाष्य करून येथील शांतता धोक्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी.

– पुरुषोत्तम कडलग, प्रदेश कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वर मंदिरात धूप दाखविण्याची परंपराच नाही : आ. नितेश राणे appeared first on पुढारी.