
त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
गत आठवड्यात संदल मिरवणुकीवेळी मंदिर प्रवेशाच्या कथित प्रवेशाच्या घटनेनंतर नाशिक, पुणे यासह राज्यभरातील हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायऱ्यांवर पाणी, दूध, गोमूत्र शिंपडत तसेच उपस्थित ब्रह्मवृंदाने मंत्रोच्चार करत शुद्धीकरण केले. पुणे, नाशिक येथील हिंदू संघटनांचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महाआरतीसाठी जात असताना नैवेद्याची वेळ झाल्याने जवळपास 45 मिनिटे गर्भगृहाचा दरवाजा बंद ठेवण्यात आला होता. सर्व पदाधिकाऱ्यांनी दक्षिण बाजूच्या दरवाजासमोर बसून मंत्रपठण केले. शुद्धीकरणाच्या आजच्या कार्यक्रमात विविध संघटनांनी स्वतंत्र पद्धतीने पूजन केले. मात्र, महाआरतीसाठी सर्व सभामंडपात एकत्र आले होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे, जिल्हा अध्यक्ष डॉ. दिलीप जोशी, भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले, युवा मोर्चा अध्यक्ष विराज मुळे, लव जिहाद संघटनेचे गजूभाऊ घोडके, नाशिक पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यासह सकल हिंदू समाजाचे स्थानिक आणि बाहेरगावचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसांपासून नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेशाच्या कथित प्रकरणावरून खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या एकतर्फी वृत्तांकनामुळे शहरातील वातावरण काहीसे नाजूक बनले आहे. त्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिल्यानंतर उरुसाच्या चार तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी उरूस निघाल्यानंतर आयोजकांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला. त्यानंतर आज विविध हिंदू संघटनांकडून मंदिर प्रवेशद्वारावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर पोलिस आणि मंदिर प्रशासनास निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
पोलिसांची कौशल्यपूर्ण हाताळणी
महाआरतीवेळी कोणताही तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलिसांनी सर्व परिस्थिती अतिशय कौशल्याने हाताळत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून त्र्यंबकेश्वरमध्येच तळ ठोकून आहेत. शहरात कोठेही तणावाचे वातावरण नसून स्थानिक नागरिक मात्र त्यांच्या नेहमीच्या कामात गर्क आहेत.
हेही वाचा :
- Facebook Account Hack : गंगापूर तहसीलदारांचे फेसबुक अकाउंट हॅक; अज्ञात व्यक्तीकडून पैशाची मागणी
- अमरावती : बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने सुनावली २० वर्षांची शिक्षा
- Morgan Stanley Report : चालू आर्थिक वर्षात भारताचा जागतिक जीडीपीत १६ % वाटा; मॉर्गन स्टॅन्लेचा अहवाल
The post त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरण : हिंदू संघटनांकडून मंदिर प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण appeared first on पुढारी.