Nashik : ते आले त्यांनी पाहिले अन् चक्क ‘एटीएम’च पळवले

एटीएम पळवले,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड सामनगाव रोडवरील आरपीएफ सेंटरजवळील एटीएम केंद्रातून चोरट्यांनी एटीएमच चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली असून ६ ते ७ चोरट्यांनी ही चोरी केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस तपास करीत असून चोरट्यांचा शोध घेत आहेत.

चाडेगाव रोडवरील रेल्वे सुरक्षा दलाच्या प्रशिक्षण केंद्राजवळ स्टेट बँकेचे एटीएम आहे. या ठिकाणी शहर व ग्रामीण भागातील नागरिक पैसे काढण्यासाठी येत असतात. रविवारी (दि.९) पहाटे चार ते साडेचार वाजता दोन वाहनांमधून चोरट्यांची टोळी परिसरात आली. त्यांनी एटीएम केंद्राजवळ पिकअप वाहन उभे केले. त्यानंतर चोरट्यांनी केंद्रात शिरून एटीएमच चोरून नेले. केंद्राबाहेरील सीसीटीव्ही ताेडण्याचा प्रयत्न केला. चाेरट्यांनी कटावणी व अन्य साहित्याद्वारे एटीएम मशिनची तांत्रिक यंत्रणा ताेडून मशिन बाहेर काढत पिकअपमध्ये टाकले. त्यानंतर टोळीने तेथून पळ काढला. एटीएम केंद्रामधील मशिन नसल्याने व एटीएमच्या मुख्य सेंटरवरुन पाेलिसांना काॅल गेल्याने नागरिक व नाशिकराेड पाेलिस दाखल झाले. तेथील सीसीटीव्ही फूटेज तपासले असता त्यात पिकअप व स्विफ्ट डिझायर वाहने परिसरातून जाताना दिसली. घटनास्थळी फाॅरेन्सिक एक्सपर्ट, श्वान पथक दाखल झाले. त्यांनी चाेरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपेक्षीत यश आले नाही.

काही वर्षांपूर्वी जेलराेड येथील मंजुळा मंगल कार्यालयाजवळील एटीएम चाेरट्यांनी चाेरुन नेले हाेते. पुन्हा अशा घटनेची पुनरावृत्ती झाल्याने एटीएम केंद्राच्या सुरक्षीततेचा प्रश्न चर्चिला जात आहे. शहर पोलिसांनी एटीएम फोडणाऱ्या परप्रांतिय टोळीला जेरबंद केले होते. त्यानंतर हा प्रकार घडला असून हे चोरटे स्थानिक असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : ते आले त्यांनी पाहिले अन् चक्क 'एटीएम'च पळवले appeared first on पुढारी.