थक्क करणारा प्रवास: ‘तो’ कामगारापासून झाला मालक

सर्कस pudhari.news

नाशिक : आनंद बोरा
बच्चेकंपनी ज्येष्ठांना आवडणारी सर्कस आता हत्ती, घोडे, उंट नसले तरी कलावंतांच्या कसरती आणि विदूषकाच्या धमालमस्तीच्या जोरावर टिकून आहे. मात्र, यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचे सुपरस्टार सर्कसचे मालक विजय प्रकाश माने सांगतात. मराठी माणसाने सुरू केलेली ही सर्कस. या विषयी ‘पुढारी’ला अधिक माहिती देताना माने यांनी सर्कसचा इतिहासच समोर ठेवला.

१९३७ मध्ये तासगावची परशुराम लाइन सर्कस देशात प्रसिद्ध होती. त्यामध्ये त्यांचे वंशज रामाप्पा माने हे कामगार म्हणून काम करीत होते. सर्कसमधील अनुभव आल्यानंतर रामप्पा या मराठी माणसाने १९४९ मध्ये एस. जयहिंद सर्कस सुरू केली. १९६८ मध्ये गुजरातमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने ही सर्कस वाहून गेली आणि माने कुटुंब रस्त्यावर आले. पण त्यातदेखील त्यांनी हार मानली नाही. १९९३ मध्ये त्यांनी पुन्हा सर्वांच्या मदतीने न्यू गोल्डन सर्कस सुरू केली. आर्थिक बोजा वाढल्याने ती २०१२ मध्ये विकली. पुन्हा २०१५ मध्ये त्यांच्या पाचव्या पिढीने सुपरस्टार सर्कसची बांधणी केली आणि आज तिने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. या सर्कसमध्ये आज ६५ कलावंत असून, ९० लोकांचा मोठा परिवार माने सांभाळत आहेत.

सर्कससाठी रोजचा खर्च ४५ हजार रुपये आहे. भारतीय कलावंतांना व्यासपीठ देण्याचे काम या सर्कसने केले. सर्कसला शासनाकडून कोणतीही सवलत मिळत नसल्याने युवा कलावंत सर्कसमध्ये येण्यास तयार नाही. यामुळे भविष्यात सर्कस जिवंत राहील की नाही, असा प्रश्न माने यांना पडला आहे.

सर्कस pudhari.news

 

एकाच कुटुंबातील चाैघे जोकर
सर्कसमध्ये जोकर हसतोय पण अंतर्मनात प्रचंड दुःख ठेवूनच. सर्कसमध्ये शैलेश नायक त्याचे दोन भाऊ आणि वडील असे चाैघे जोकर म्हणून काम करतात. पाच भाऊ आणि एक बहीण असे कुटुंब असलेल्या या घरात सर्व उंचीने कमी असल्याने पोटाची खळगी भरविण्यासाठी सर्कसशिवाय पर्याय नव्हता. आता सर्कस हेच त्यांचे कुटुंब बनले आहे. शैलेश हा प्रेक्षकांना हसविण्याबरोबर अनेक कलादेखील सादर करतो. कला सादर करणारा तो देशातील सर्वात लहान जोकर आहे. रामसिंग चार्ली या चित्रपटातदेखील त्याने काम केले आहे. सर्कसमध्ये अँकरिंगदेखील जोकरच करतात. वर्षातून ते एकदाच घरी जातात. शहरात सर्कस आली आहे, याची दवंडीदेखील हेच जोकर रिक्षात फिरून करतात.

 

सर्कस pudhari.news

‘फायर डान्स’मधून साकार झाली त्यांची प्रेमकहाणी
सर्कस हेच कुटुंब आणि कलावंत हीच जात मानणारे राजू शिंदे आणि सपना शिंदे यांची अनोखी प्रेमकहाणी आहे. राजू हे औरंगाबादकर, तर सपना या नेपाळच्या आहेत. गेली २० वर्षे ते एकत्र सर्कसमध्ये काम करतात. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी विवाहदेखील केला. त्यांना तन्मय नावाचा मुलगा आहे. राजू हे सर्कसमध्ये ग्लोब रायडिंग करतात. दुचाकीवर लोखंडी चक्रात गाडी फिरविण्याचे काम ते करतात. या खेळात मोठा धोका असतो. त्यांचे खेळ बघून गोव्यामध्ये अभिनेता अक्षय कुमारनेदेखील त्यांचे कौतुक केले होते. त्यांची पत्नी दहा वर्षांपासून माहेरी नेपाळला गेलेल्या नाहीत. आपल्या मुलाने भरपूर शिकून अधिकारी बनावे, असे स्वप्न त्या बघतात. फायर डान्स आणि रिंग डान्स त्या सादर करतात.

आमच्या पूर्वजांनी, मराठी माणसांनी सुरू केलेली सर्कस आम्ही आजही सुरू ठेवली आहे. वन्यप्राण्यांना बंदी आणल्यानंतर सर्कस चालविणे खूपच अवघड बनले. लाख रुपये रोजचा खर्च असून, शासनाकडून सर्कसला कोणतीही सुविधा मिळत नाही. शहरात सर्कस आणण्यासाठी अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. मैदानभाडेदेखील प्रचंड आहे, यामध्ये सवलत मिळायला हवी. – विजय प्रकाश माने, मालक, सुपरस्टार सर्कस.

The post थक्क करणारा प्रवास: 'तो' कामगारापासून झाला मालक appeared first on पुढारी.