सिन्नर: चोरट्यांचा एटीएम मधून रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला

ATM फोडले pudhari.news

नाशिक (दातली – सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
मुसळगाव एमआयडीसी येथे असलेल्या सारस्वत बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांकडून फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. ही घटना बुधवार (दि. १३) पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घडली. चोरट्यांना रोकडचा कॅशवार्ड खोलण्यात अपयश आल्याने एटीएम मधील रक्कम वाचली आहे. मात्र, चोरट्यांनी एटीएम मशीनचे मोठे नुकसान केले आहे.

बुधवारी (दि. १३) पहाटे साडेचार वाजेच्या दरम्यान अज्ञात चौघा चोरट्यांनी एटीएम मध्ये प्रवेश करत सुरक्षारक्षकास मारहाण करून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला व एटीएम मशीन बाहेर ओढून काढली. चोरट्यांनी एटीएमची फोडतोड केली. परंतू मशीनचा कॅशवार्ड उघडता न आल्याने त्यांना त्यातील रक्कम लांबविता आली नाही. सुरक्षारक्षकाने सकाळी सहा वाजता याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत बाविस्कर , भगवान शिंदे, रोहित सानप, नवनाथ चकोर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहे. चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन घटनास्थळापासून 300 मीटर पुढे मुसळगाव फाटा परिसरात आढळून आले.

सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासात मिळणार मदत
एमआयडीसी परिसरात सारस्वत बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. मात्र, लॉकर खोलण्यात अपयश आल्याने त्यामधील रक्कम वाचली. या एटीएममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहे. त्या कॅमेर्‍यामध्ये चौघेजण कॅमेऱ्यात कैद झाले आहे. यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्याला सुरुवात केली आहे.

The post सिन्नर: चोरट्यांचा एटीएम मधून रोकड पळविण्याचा प्रयत्न फसला appeared first on पुढारी.