नूतनीकरण वातानुकूलन यंत्रणेवर पुन्हा दीड कोटीचा खर्च

महाकवी कालिदास कलामंदिर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 
तब्बल १२ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण केलेल्या महापालिकेच्या महाकवी कालिदास कलामंदिराचे रडगाणे सुरूच आहे. वर्षभरापूर्वी भर कार्यक्रमात वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याचा प्रकार घडल्यानंतर आता पुन्हा या वातानुकूलन यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या नावावर तब्बल १.४० कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे.

महापालिकेचे महाकवी कालिदास कलामंदिर नाशिकचे सांस्कृतिक केंद्र बनले आहे. शहरातील नाट्यक्षेत्राला उभारी देण्याचे काम या नाट्यगृहाच्या माध्यमातून सातत्याने घडत आहे. कालिदास कलामंदिराच्या देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ कलावंतांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील महापालिका प्रशासनाचे कान टोचले होते. त्यानंतर तब्बल १२ कोटी रुपये खर्चातून कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. या नाट्यगृहात आधुनिक संगीत व्यवस्था, नूतन वातानुकूलन यंत्रणा, आरामदायी आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर झालेला खर्च वसुलीच्या नावाखाली प्रशासनाने लागू केलेल्या या नाट्यगृहाच्या भाडेवाढीवरून वाद उभा राहिला होता.

कोरोना काळात शासन निर्देशांनुसार हे नाट्यगृह बंद होते. त्यात देखभाल दुरुस्तीकडेही तत्कालीन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे कोराेनानंतर हे नाट्यगृह सुरू झाले तेव्हा नाटकाचा प्रयोग सुरू असताना नवी कोरी वातानुकूलित यंत्रणा बंद पडली. त्यामुळे नाट्यप्रेमींना त्रास सहन करावा लागला. नाटकाचा प्रयोग मध्येच बंद करण्याची नामुष्की ओढावली. त्यातून महापालिकेचीही बरीच नाचक्की झाल्याने तत्कालीन प्रभारी आयुक्त तथा विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाट्यगृहाचे व्यवस्थापक जगन्नाथ कहाणे यांना निलंबित केले होते. आता पुन्हा एकदा वातानुकूलन यंत्रणेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली तीन वर्षांचा ठेका मंजूर करण्यात आला आहे.

असा होणार खर्च
महापालिकेत अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे खासगीकरणातून कालिदासच्या देखभाल दुरुस्तीसाठी सात कर्मचारी नियुक्त केले जाणार आहे. त्यासाठी तीन वर्षांकरिता ९४ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. याबरोबर ४५ लाख ३८ हजार रुपये खर्चातून वातानुकूलन यंत्रणेची सर्वसमावेशक दुरुस्ती केली जाणार आहे.

हेही वाचा:

The post नूतनीकरण वातानुकूलन यंत्रणेवर पुन्हा दीड कोटीचा खर्च appeared first on पुढारी.