दिंडोरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मतदारसंघात उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून, यंदाच्या निवडणुकीत प्रचारादरम्यान मतदारांना वेगळे चित्र पाहावयास मिळत आहे. गेली २५ वर्षे जे नेते, कार्यकर्ते, एकमेकांशी लढले, तेच नेते व कार्यकर्ते आज एकमेकांच्या हातात हात घालून आपल्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघातील मतदार हे चित्र पाहून बुचकळ्यात पडले आहेत. Lok Sabha Election 2024
राज्यातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर दोन शिवसेना व दोन राष्ट्रवादी उदयास आल्या. उद्धव ठाकरेंची शिवसेना शरद पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर मात्र एकनाथ शिंदेंची शिवसेना भाजपबरोबर आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेसोबत आहे. मात्र अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसमवेत आहे. दिंडोरी लोकसभा असो, दिंडोरी विधानसभा असो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना नेहमी राष्ट्रवादीच्या विरोधातच लढत आली आहे. काँग्रेसची ताकद नगण्य असल्याने राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच प्रखर सामना मतदारसंघात बघायला मिळत असे. मात्र राज्यात पक्षफुटीनंतर नवीन समीकरण तयार झाल्याने एकमेकांचे राजकीय वैरी एकत्र आल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे. Lok Sabha Election 2024
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे निवडणूक लढवत आहेत. त्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बळ मिळत आहे, तर भाजपकडून केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून, त्यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. जसजसा उन्हाचा तडाखा वाढत आहे, तसतसा उमेदवारांचा प्रचारही जोरदार सुरू आहे. मतदारसंघातील मतदारांच्या भेटीगाठीवर सध्या दोन्ही उमेदवारांनी भर दिला आहे. गावनिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असून, महायुती व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना नेते मंडळी मार्गदर्शन करत आहेत. राजकारणात कधीच कुणी कुणाचा मित्र अन् शत्रू नसतो याची प्रचिती यंदाच्या निवडणुकीत येत आहे. मात्र जे कार्यकर्ते वर्षानुवर्षे परस्परांशी प्रत्यक्ष राजकीय मैदानात एकमेकांना भिडतात, त्यांच्या हाती काय लागते, हाच प्रश्न अनुत्तरित आहे. Lok Sabha Election 2024
हेही वाचा –
- Lok Sabha Election 2024 | नाशिकच्या जागेवरुन प्रफुल्ल पटेल, संजय शिरसाट यांच्यात वाक्युध्द
- अंतराळात गेल्यावर माणूस तरुण राहतो?
The post दिंडोरीत एकमेकांचे विरोधकच झाले प्रचारक, मतदारही बुचकळ्यात appeared first on पुढारी.