दिंडोरीत भाजप सत्ता राखणार की राष्ट्रवादी मुसंडी मारणार?

भास्कर भगरे, भारती पवार

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मालेगाव लोकसभा मतदारसंघात मतदारांनी तब्बल ३५ वर्षे काँग्रेसला संधी दिली. स्व. झेड. एम. कहांडोळ यांनी या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले. आणीबाणीनंतर तत्कालीन भारतीय लोकदलाकडून निवडणूक लढविलेल्या स्व. हरिभाऊ महाले यांनी कहांडोळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही महाले विरुद्ध कहांडोळ असाच सामना पाहायला मिळाला. मात्र, १९८० साली महालेंना पराभूत करून पुन्हा कहांडोळ विजयी झाले. त्यानंतरच्या झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा महालेंनी विजय मिळविला. भाजपचे कचरूभाऊ राऊत यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, तत्कालीन सरकार पडल्याने राऊतांना अत्यंत कमी कालावधी मिळाला होता. तेव्हा भाजपने या मतदारसंघात पहिल्यांदा खाते उघडले होते. बारामतीनंतर सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणून एकेकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केला होता. मात्र, आजपर्यंत त्यांना तो भाजपकडून खालसा करण्यात अपयश आले, (Dindori Lok Sabha 2024)

२००४ च्या लोकसभा निवडणुकीत जनता दलाकडून हरिभाऊ महाले विरुद्ध भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण अशी लढत झाली. त्यात महालेंचा पराभव करून चव्हाण विजयी झाले. त्यानंतर लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत मालेगाव लोकसभा मतदारसंघाचे रूपांतर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाले. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार नरहरी झिरवाळ यांना शरद पवारांनी राष्ट्रवादीचे तिकीट देऊन मैदानात उतरविले होते. मात्र, त्या निवडणुकीतही भाजपच्या चव्हाणांनी विजयश्री खेचून आणली, तेव्हापासून आजतगायत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. (Dindori Lok Sabha 2024)

मागील २०१९ च्या निवडणुकीत ऐनवेळी हरिश्चंद्र चव्हाणांचे तिकीट कापून राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवारांना भाजपने उमेदवारी जाहीर केली तर शिवसेनेतून आलेल्या माजी आमदार धनराज महालेंना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली. त्यावेळी झालेल्या निवडणुकीतही महालेंचा डॉ. पवारांनी पराभव केला होता. आता पुन्हा एकदा भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनाच उमेदवारी दिली असून, राष्ट्रवादीने पेशाने शिक्षक असलेल्या भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजप व राष्ट्रवादीत सरळ लढत होत असू,न या निवडणुकीत तरी मागील पराभवाचा वचपा काढण्यात राष्ट्रवादीला यश येते की, भाजप आपला गड शाबूत राखण्यात यशस्वी होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

गेल्या चार पंचवार्षिकमध्ये झालेल्या लढती (Dindori Lok Sabha 2024)

वर्ष- उमेदवार

२००४- हरिभाऊ महाले (जनता दल) विरुद्ध हरिश्चंद्र चव्हाण (भाजप ) विजयी

२००९- नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी) विरुद्ध हरिश्चंद्र चव्हाण (भाजप ) विजयी

२०१४- डॉ. भारती पवार ( राष्ट्रवादी) विरुद्ध हरिश्चंद्र चव्हाण (भाजप ) विजयी

२०१९- धनराज महाले (राष्ट्रवादी) विरुद्ध डॉ. भारती पवार (भाजप) विजयी

हेही वाचा –

The post दिंडोरीत भाजप सत्ता राखणार की राष्ट्रवादी मुसंडी मारणार? appeared first on पुढारी.