नाशिक (खामखेडा) : पुढारी वृतसेवा
देवळा तालुक्यातील माळवाडी गावात महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी वीज गळती रोखणाऱ्या उपाययोजना राबवत माळवाडी गाव आकडे व वीजसमस्या मुक्त केले. वीज चोरी होणाऱ्या भागात केबल टाकून प्रतिबंध करण्यात आला आहे.
गावात १७ रोहित्र, ५६० घरगुती ग्राहक, ३१० कृषी ग्राहक असून सद्य स्थितीत एकही रोहित्र अतिभारीत नाही. सर्व रोहित्रांना बॉक्सपेटी, एचटी-एलटी लाईन, अर्थिंग आहे. तसेच अनधिकृत व कायमस्वरूपी थकीत ग्राहकास वीज जोडणी शुल्क रक्कम भरून अधिकृत करण्यात आले आहे.
वर्षभरापूर्वी शेती अर्थव्यवस्था अडचणीमुळे सदर गावाने गाव विकण्यासाठी ठराव केला होता. या ठरावाची महावितरण अधिकारी व कर्मचारी यांनी दखल घेऊन सदर गावात वीज समस्यांचे वर्षभर नियोजन करत त्याची यशस्वी अंमलबजावणी केली. त्यामुळे देवळा उपविभाग व ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने माळवाडी गावात लाईनमन दिवस ग्रामपंचायत सभागृहात साजरा करण्यात आला.
माळवाडी गावातील लाईनमन विनोद शेवाळे यांचा विशेष योगदानासाठी उपकार्यकारी अभियंता सुरवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कनकापूर वडाला गावातील थकबाकी शून्य केल्यामुळे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण पवार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपविभागातील सर्व जनमित्रांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सहाय्यक अभियंता घनश्याम कुंभार यांनी गाव आकडे व वीज समस्या मुक्त करण्यासाठी जनमित्र विनोद शेवाळे व ग्रामस्थांची मदत झाल्याचे गौरवोद्गार काढले. अध्यक्षीय मनोगत माळवाडी उपसरपंच मयूर बागुल यांनी आपल्या मनोगतात महावितरण अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक करून चांगल्या कार्यासाठी माळवाडी ग्रामस्थ सतत आपल्या पाठीशी राहून आदर्श माळवाडी प्रयत्नशील राहील. त्याची ग्वाही दिली.
देवळा उपविभाग अग्रेसर
राज्यातील ३ कोटी वीज ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा मिळण्यासाठी महावितरण विशेष मोहीम राबवित आहे. याबाबतीत देवळा उपविभाग सतत अग्रेसर असून फेब्रुवारी महिन्यात व्यवस्थापनाने घरगुती, व्यापारी व औद्योगिक वीज वसूलीमध्ये उदिष्ट पूर्ण करून परिमंडळ उपविभागमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे.
सौरवीजेमुळे अनुदान बचत
मुख्यमंत्री सौर वीज योजनेंतर्गत देवळा उपविभागामध्ये 80 मेगावॅट वीजनिर्मिती करून शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे. या योजनेंतर्गत डिसेंबर २०२४ पर्यंत ७००० मेगावॅट सौरवीजनिर्मिती करून १३ हजार कोटींचे अनुदान व राज्य सरकारच्या दोन हजार कोटी अनुदानाची बचत केली जाणार आहे.
The post दिलासादायक बातमी : लाईनमनमुळे झाली माळवाडी वीज आकडेमुक्त appeared first on पुढारी.