कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार: दादा भुसे

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; ड्रग्ज प्रकरणात माझ्यावरील सर्व आरोप खोटे, राजकीय हेतूने प्रेरीत आहेत. अशा आरोपांना मी भिक घालत नाही. नार्को टेस्ट करा, अथवा कोणतीही चौकशी करा मी त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे स्पष्ट करत ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन, असा निर्वाणीचा इशारा पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या गौप्यस्फोटानंतर नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मी ससून रुग्णालयातून पळालो नाही तर मला पळवले गेले. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, मी सगळं सांगणार आहे, असे पाटील याने सांगितल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा दादा भुसे आणि शंभुराज देसाई यांच्या चौकशीसह नार्को टेस्टची मागणी केली आहे. त्यास दादा भुसे यांनी पुन्हा प्रत्युत्तर देत कोणत्याही चौकशीला आणि नार्को टेस्टला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. भुसे म्हणाले की, मागील वेळी देखील सुषमा अंधारे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी देखील चौकशी करा, असे सांगितले होते. आता पुन्हा त्यांची चौकशीची मागणी असेल, तर त्याला सामोरे जायची तयारी आहे. कोणतीही चौकशी करा, नार्को टेस्ट करा, काही आंतरराष्ट्रीय पातळीवरची चौकशी करायची आहे ते करा, अस भुसे म्हणाले.

अशा आरोपांना भीक घालत नाही. त्या दिवशी देखील बोललो, आजही बोलतो, माझं उत्तरदायित्व हे जनतेशी आहे. मंगळवारी अंमली पदार्थ जनजागृती चळवळीसंदर्भात बैठक घेऊन येत्या आठ दिवसात या प्रकरणाची पाळेमुळे उखडून टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे भविष्यात नाशिक शहरात तुम्हाला मोठ्या प्रमाणात कारवाई दिसेल. अवैध धंद्यांना कुठेही आश्रय दिला जाणार नाही. असेही भुसे यांनी सांगितले. प्रसिद्धी मिळवण्यासाठीच आपल्याविरोधात बेछूट आरोप केले जात आहेत, असे नमूद करत यांच्या पाठीमागे बोलवता धनी कोणी आहे का? त्यांची पण नार्को टेस्ट करावी लागेल, असा पलटवारही भुसे यांनी ठाकरे गटावर केला आहे.

नैतिकता असेल तर राजीनामा द्या : बडगुजर

ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिंदे येथे ड्रग्ज कारखाना पोलिसांनी सील केल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे गरजेचे होते. मात्र ते स्वत:ला वाचविण्यासाठी प्रशासनाला हाताशी धरत बैठका घेत आहेत. नाशिककर ड्रग्ज विरोधात रस्त्यावर उतरून पालकमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. त्यामुळे नैतिकता म्हणून आधीच त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी बडगुजर यांनी केली आहे.

The post कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार: दादा भुसे appeared first on पुढारी.