मद्यपी चालकाच्या बेधुंद कृत्यामुळे घराची संरक्षक भिंत, दुकानाचेही नुकसान

accident pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा

सोयगाव गावठाण मधील मुख्य रस्त्यावर गुजरात येथील मद्यपी ट्रक चालकाने मंगळवारी (दि.३०) रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास बेधुंद व सुसाट ट्रक चालवत दुकान, घराची संरक्षक भिंत व रस्त्यावरील झाडाला धडक देत जान्हवी ठोमरे (कोळी) या १७ वर्षीय तरुणीला उडवले. यात तरुणीचा नाशिक येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

गुजरात येथील ट्रक क्रमांक जीजे २७ टीडी ६२९० वरील ट्रकचालक हा सोयगाव येथील डी. के. चौकाकडून टेहरे चौफुलीकडे जात होता. नशेत असणाऱ्या ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील वाहन सकाळी सव्वासात वाजेच्या दरम्यान बेधुंदपणे चालवत डी. के. चौकातील झाडला कट मारला. त्यानंतर चिंतामण बच्छाव यांच्या घराची संरक्षक भिंत उडवत त्या पुढे असणाऱ्या दिपक बच्छाव यांचे दुकान तोडले. त्यानंतर फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या १७ वर्षीय जान्हवी कोळी या तरुणीला उडवल्यानंतर सदर ट्रक थेट टेहरे गावाच्या दिशेने सुसाट दामटवला. सकाळी अंगण झाडत असलेल्या प्रत्यक्षदर्शी हर्षदा बच्छाव यांना मोठा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले असता रस्त्याने प्रचंड धुराडा व वेगाने जाणारा ट्रक त्यांना दिसला. हर्षदा यांनी त्वरीत पती हर्षल बच्छाव यांना झोपेतून उठवत घटनेबाबत माहिती दिली. हर्षल बच्छाव यांनी वेळ न गमावता जोडीदाराला बरोबर घेत दुचाकीवर ट्रकच्या दिशेने पाठलाग करत ट्रक चालकास टेहरे येथे पकडले. त्यानंतर त्यांनी कॅम्प पोलीसांना माहिती दिल्यानंतर ट्रक चालकासह व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या अपघातात गंभीर जखमी कोळी हिचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी झालेल्या अपघातात, आयोध्यानगर येथील तरुणी जान्हवी कोळी ही सकाळी फिरण्यासाठी निघाला होती. रस्त्याने जात असताना ट्रक चालकाने तिला उडवल्याने या अपघातात ती गंभीर जखमी होऊन तिच्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असतानाच दुपारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यापुर्वी देखील सोयगाव मराठी शाळेजवळ झालेल्या अपघातात माधुरी सूर्यवंशी (१७) या तरुणीला आपला पाय गमवावा लागला आहे.

The post मद्यपी चालकाच्या बेधुंद कृत्यामुळे घराची संरक्षक भिंत, दुकानाचेही नुकसान appeared first on पुढारी.