नाशिकसाठी आहेर, दिंडाेरीसाठी सानप; लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी

केदा आहेर, बाळासाहेब सानप,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपने गुरुवारी (दि. ८) नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुखपदी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांची निवड केली आहे. दिंडोरीची जबाबदारी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे सोपविण्यात आली. लोकसभा मतदारसंघ प्रमुखांची निवड करत भाजपने आणखी एक मास्टरस्ट्रोक मारला आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

अवघ्या ८ महिन्यांवर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असले तरी भाजप यात एक पाऊल पुढे आहे. भाजपने यापूर्वीच उत्तर महाराष्ट्राच्या प्रमुखपदी विजय चाैधरी, तर नाशिक जिल्ह्याची जबाबदारी पक्षाचे उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांच्या खांद्यावर सोपविली. त्यामुळे खळबळ उडाली असताना पक्षाकडून आता राज्यातील ४८ लोकसभा आणि २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी प्रमुख निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिकसाठी आहेर, तर दिंडाेरीसाठी सानप यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदारसंघांसाठी प्रमुख नेमण्यात आले आहेत.

राज्यातील भाजप-शिवसेनेचे दोनच दिवसांपूर्वी आगामी निवडणुका एकत्रित लढण्यावर एकमत झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितरीत्या तशी घोषणाही केली. मात्र, या घोषणेला अवघ्या दोन दिवसांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच भाजपने लोकसभा-विधानसभा प्रमुखांची नियुक्ती केली आहे. भाजपच्या या खेळीमुळे शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावण आहे.

पवार, घोलप यांची नियुक्ती

लोकसभेसोबत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी भाजपने प्रमुखांची निवड केली आहे. येवला मतदारसंघासाठी माजी जि. प. सदस्या अमृता पवार, तर देवळालीसाठी तनुजा घोलप यांची नियुक्ती केली आहे. तसेच नांदगावसाठी पंकज खताळ, मालेगावमध्ये सुनील गायकवाड, मालेगाव बाह्य देवा पाटील, बागलाण पंकज ठाकरे, कळवण रमेश थोरात, चांदवड भूषण कासलीवाल, सिन्नर जयंत आव्हाड, दिंडाेरी संजय वाघ, नाशिक पूर्व सुनील केदार, मध्य अनिल भालेराव, पश्चिम राजेश दराडे व इगतपुरीसाठी सीमा झाेले आदींच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिकसाठी आहेर, दिंडाेरीसाठी सानप; लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी appeared first on पुढारी.