नाशिक : घंटागाडीच्या ‘ऑन फिल्ड’ चौकशीला अखेर सुरुवात

घंटागाडी नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूर व पंचवटी या दोन विभागांतील घंटागाडी ठेकेदारांविरुद्ध झालेल्या तक्रारींची ऑन फिल्ड चौकशी शुक्रवार (दि. ९) पासून करण्यास सुरुवात झाली आहे. समितीचे सदस्य अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागात जाऊन याबाबतची माहिती घेतली होती. आता चौकशी अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

पंचवटी व सातपूर विभागांतील घंटागाडी संदर्भातील तक्रारींवरून प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. दिलेल्या मार्गावरून घंटागाडी न धावणे, घंटागाड्यांची संख्या कमी असणे, जीपीएस यंत्रणा न बसविणे, ओला व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण न करणे तसेच करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे घंटागाड्या नसणे आदी तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. सातपूर व पंचवटी विभागांतील घंटागाडी ठेकेदाराविरोधात तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांची देयके राखून ठेवण्यात आली होती. असे असताना घनकचरा व्यवस्थापन विभागाने संबंधित ठेकेदारांना देयके अदा केल्याने या प्रकरणातील संशय वाढीस लागला आहे.

दरम्यान, घंटागाडी थांबत असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी जाऊन समितीचे सदस्य पाहणी करणार आहेत. घंटागाड्यांचे आरटीओ परवाने, लायसन्स, वाहनांची सुस्थिती घंटागाड्यांची वजन व क्षमता यांसह अनेक तांत्रिक बाबींची माहिती घेऊन समिती खात्री करणार आहे. येत्या आठ दिवसांत संपूर्ण चौकशी समिती अहवाल मनपा आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. या चौकशी समितीत वित्त व लेखा अधिकारी नरेंद्र महाजन, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी, कार्यकारी अभियंता बाजीराव माळी तसेच घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांचा समावेश आहे. दरम्यान, यासंदर्भात चौकशी समिती सदस्यांना विचारले असता, त्यांनी संबंधित खात्याकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगितल्याने अहवालाबाबत महापालिका वर्तुळात उत्सुकता आहे.

आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

महापालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, चौकशी वेळेत सुरू न केल्याने आयुक्तांच्याच आदेशाला केराची टोपली दाखविल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगत आहे. दरम्यान, समितीला आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिलेल्या डॉ. कल्पना कुटे या रजेवर असल्याने चौकशीला सुरुवात केली गेली नसल्याची सारवासारव यावेळी करण्यात आली.

घंटागाडी अनियमिततेबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली असून, घंटागाड्यांची स्थिती, फेऱ्या कर्मचाऱ्यांकडून ठेकेदारांवर केले जाणारे आरोप, स्वच्छता निरीक्षकाला झालेली शिवीगाळ या सर्व बाबींची सखोल चौकशी केली जाणार आहे.

– भाग्यश्री बानायत, अतिरिक्त उपआयुक्त, मनपा

हेही वाचा :

The post नाशिक : घंटागाडीच्या 'ऑन फिल्ड' चौकशीला अखेर सुरुवात appeared first on पुढारी.