देवळा (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील पिंपळगाव (वा.) येथील एका तरुणाचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवार (दि .२९) रोजी निबोंळा (ता. देवळा) येथे रात्री ९.१५ च्या सुमारास घडली.
पिंपळगाव (वा.) येथील गणेश पगार यांचा अर्थमुव्हिंगचा व्यवसाय आहे. त्यांचे स्वमालकीचे जेसीबी निंबोळा (ता.देवळा) येथे सुरू आहे. या जेसीबीसाठी लागणाऱ्या इंधनासाठी पगार यांचा मुलगा दर्शन (वय २०) निबोंळा येथे गेला होता. इंधन दिल्यानंतर परत येत असताना परिसरातील विहिरीत दर्शनचा पाय घसरला आणि तो पडला. पडताच क्षणी त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. दर्शनाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. दर्शनाच्या आकस्मिक मृत्यूची नोंद मालेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. गणेश पगार यांचा दर्शन हा एकुलता एक मुलगा होता. अतिशय शांत स्वभावाच्या या तरुणाच्या निधनाने पंक्रोशीतील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवार (दि .३०) रोजी पिंपळगाव (वा.) येथील अमरधाम येथे दर्शन याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास देवळा पोलीस करीत आहेत.
हेही वाचा: