द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक, सहा लाखांना गंडा

जानोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील द्राक्ष उत्पादकाकडून द्राक्षे खरेदी करून सहा लाख रुपये बुडविल्याच्या तक्रारीवरून दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा वणी पोलिसांनी दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर बाळकृष्ण बैरागी (रा. शिंदवड, दिंडोरी) यांची शिंदवड येथे शेती आहे. त्यांनी आपल्या द्राक्षबागेतील 6 लाख 27 हजार 500 रुपयांची द्राक्षे लोकेंद्र सिंह व दिवान सिंह (रा. फतेपूर सिक्री, हसनपुरा, आग्रा) यांनी खरेदी केली व या व्यवहारापोटी 26 हजार रुपये रोख दिले. उर्वरित रक्कम नंतर देतो, असे सांगून संपूर्ण द्राक्षे खुडून नेली. काही दिवसांनंतर बैरागी यांनी संबंधित व्यापाऱ्यांशी संपर्क साधला व वेळोवेळी पैशाची मागणी केली. मात्र, आश्वासनाव्यतिरिक्त पदरात काहीच पडले नाही. आर्थिक नुकसानीमुळे हताश व व्यथित झालेल्या बैरागी यांनी वणी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी दोन संशयितांविरोधात संगनमताने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा –

The post द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक, सहा लाखांना गंडा appeared first on पुढारी.