राजूरबहुला एमआयडीसीसाठी हेक्टरी दोन कोटींचा दर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-सातपूर, अंबड व माळेगाव या प्रमुख औद्योगिक वसाहतींव्यतिरिक्त दिंडोरीत नव्याने अक्राळे औद्योगिक वसाहतीने आकार घेतला आहे. मात्र, अशातही उद्योगांना जागा कमी पडत असल्याने जिल्ह्यात जाबुटके (दिंडोरी), मापारवाडी (सिन्नर) व मनमाडसह राजूरबहुला येथे जमीन संपादनाची प्रक्रिया गतिमान केली आहे. दरम्यान, राजूरबहुला येथे १४४.४३ हेक्टर जमीन संपादीत केली जाणार असून, तब्बल दोन कोटी ३५ लाख प्रति हेक्टर याप्रमाणे दर निश्चित केला आहे. पहिल्या टप्प्यात ४९ हेक्टर जमीनीचा झाला असून, त्यापोटी १२३ कोटींची मागणी स्थानिक प्रशासनाने एमआयडीसी मुख्ययालयाकडे केली आहे.(Nashik Rajur Bahula MIDC)

नाशिकमधून जाणारा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रस्तावित असून, भविष्यात नाशिक हे उद्योगांसाठी सर्वाधिक हॉट डेस्टिनेशन ठरण्याची शक्यता आहे. अशात शहरापासून अगदीच जवळ असलेल्या राजुरबहुला शिवारात औद्योगिक वसाहत उभारण्याच्या घोषणेपासूनच या परिसराकडे उद्योजकांचे लक्ष लागून आहे. राजुरबहुला शिवारात औद्योगिक वसाहतीसाठी एकुण १४४.४३ हेक्टर म्हणजेच ३६० एकर जमीन संपादन केली जाणार आहे. त्यापैकी ४९ हेक्टर जमीनीचा निवाडा झाला असून, त्यासाठी २ कोटी ३५ लाख म्हणजेच ९४ लाख रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दर निश्चित करण्यात आला आहे. ४९ हेक्टर जमीन संपादनासाठी लागणाऱ्या १२३ कोटींची मागणी स्थानिक प्रशासनाने एमआयडीसी मुख्यालयाकडे केली असून, लवकरच ४९ हेक्टर जमीन ताब्यात घेतली जाणार आहे. तसेच उर्वरीत क्षेत्र संपादनासाठी देखील युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असून, एप्रिलपर्यंत या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना भूखंड उपलब्ध करून दिले जाण्याचा आशावाद प्रशासनाकडून बोलून दाखविला जात आहे. (Nashik Rajur Bahula MIDC)

आयटी पार्कसाठी ५० एकर

आयटी पार्कसाठी आडगाव की राजूरबहुला हा वाद कायम असला तरी, राजुरबहुल्यात शंभर एकर परिसरात आयटी पार्क उभारला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ५० एकर जागा आयटी पार्कसाठी राखीव ठेवण्यात आली असून, उर्वरीत जागा देखील जमीन संपादनानंतर निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. ३६० एकरपैकी शंभर एकरवर आयटी पार्क उभारला जाणार असून, उर्वरीत क्षेत्रात इतर उद्योगांना प्राधान्य दिले जाण्याचे नियोजन एमआयडीसी प्रशासनाकडून केले जात आहे.

एमआयडीसीकडून प्रस्तावित भूसंपादन 

जांबूटके, दिंडोरी – ३१.५१ हेक्टर

मापारवाडी, सिन्नर – २३०.६७ हेक्टर

घोटी (आडवण) – २६२.९७ हेक्टर

पाटदेवी – ५३ हेक्टर

मनमाड – २६८.८७ हेक्टर

पुढील आठवड्यात गाळ्यांचा लिलाव?

५० कोटींचा खर्चून उभारलेल्या गाळे प्रकल्पातील २०७ गाळ्यांपैकी आतापर्यंत केवळ ४५ गाळ्यांचेच वितरण झाले असून, अद्यापही १६२ गाळे लिलावाअभावी कुलूपबंद आहेत. या गाळ्यांवर एमआयडीसी दरवर्षी सुरक्षा गार्ड, हाऊस कीपिंग, यार्ड लाइट आणि लिफ्टसाठी ५२ लाख २८ हजारांचा खर्च करत आहे. या गाळ्यांचा त्वरीत लिलाव केला जावा, अशी उद्योजकांची मागणी आहे. दरम्यान, एमआयडीसीकडून लवकरच या गाळ्यांचा लिलाव केला जाण्याची शक्यता आहे. या गाळे प्रकल्पातील अनुसूचित जाती, जमातीचे असलेल्या आरक्षणाची माहिती मागविली असून, दोन दिवसात ती प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर गाळे लिलावाची जाहिरात प्रसिद्ध केली जाऊ शकते.

हेही वाचा :

The post राजूरबहुला एमआयडीसीसाठी हेक्टरी दोन कोटींचा दर appeared first on पुढारी.