आमदार राहुल ढिकलेंच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा

मराठा आंदोलकांचा मोर्चा,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-मराठा आरक्षणासंदर्भात २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले असून, या अधिवेशनात आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडावी, अन्यथा आगामी निवडणुकीत जागा दाखवू, असा इशारा देत सकल मराठा समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा काढला जात आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढत त्यांना मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मांगण्याचे निवेदन दिले.

मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार, खासदार, मंत्र्यांच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा काढला जात आहे. त्याची सुरुवात आमदार ढिकले यांच्या निवासस्थानापासून करण्यात आली. यावेळी मराठा समाजाच्या वतीने घोषणाबाजी करीत आरक्षणासंदर्भात भूमिका मांडण्याबाबतची मागणी करण्यात आली. प्रत्येक निवडणुकीत मराठा समाजाचे मतदान निर्णायक ठरत असते. अशात आगामी निवडणुक लक्षात घेऊन आमदारांनी समाजाला पाठिंबा द्यावा, अन्यथा मराठा समाज तुम्हाला घरी बसविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

दरम्यान, आमदार ढिकले यांनी समाजबांधवांशी चर्चा करून अधिवेशनात आरक्षणाविषयी आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी सकल मराठा समाजाचे नानासाहेब बच्छाव, करण गायकर, चंद्रकांत बनकर, आशिष हिरे, संजय फडोळ, योगेश नाटकर, विजय वाहुळे, सुभाष गायकर, विलास जाधव, सचिन पवार यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते.

या मागण्यांचा पाठपुरावा करा…

– सकल मराठा समाजाला ५० टक्क्यांच्या आत ओबीसीतून घटनात्मक आरक्षण द्यावे.

– सरकार दप्तरी सापडलेल्या ५५ लाख नोंदीच्या अनुषंगाने त्वरित ओबीसी प्रमाणपत्र वाटप करावे.

– सगेसोयरेबाबत जो मसुदा तयार केला, त्या मसुद्याचे कायद्यात रूपांतर करावे.

– मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घ्यावे.

– शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी, या समितीला मुक्तपणे काम करण्याचे अधिकार द्यावे.

– मागासवर्ग आयोगाला मुदतवाढ देऊन मराठा समाजाचे फेरसर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावे.

मराठा आरक्षणप्रश्नी २० फेब्रुवारीच्या अधिवेशनात आक्रमक भूमिका मांडावी यासाठी मी जिल्ह्यातील सर्व आमदारांना प्रवृत्त करेल. मराठा समाजाच्या वतीने मला जे निवेदन दिले, ते निवेदन माझ्या लेटरहेडवर प्रसिद्ध करून जिल्ह्यातील सर्व आमदारांना तत्काळ पाठविणार आहे. एकमताने सर्वांनी आवाज उठवावा, यासाठी माझा प्रयत्न असेल.

– राहुल ढिकले, आमदार

जे आमदार मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहणार नाहीत, त्यांना आगामी निवडणुकीत मराठा समाज नक्कीच धडा शिकवेल. त्यामुळे आमदारांनी समाजासाठी विधान भवनात आवाज उठवावा. मराठा समाज त्यांच्यावर लक्ष ठेवून असेल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.

– करण गायकर, राज्य समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा

हेही वाचा :

The post आमदार राहुल ढिकलेंच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.