नाशिक महापालिकेचे २,६०३ कोटींचे अंदाजपत्रक सादर

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महापालिकेतील प्रशासकीय राजवटीतील सलग दुसरे अर्थात २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे २६०३ कोटी ४९ लाख रुपयांचे प्रारूप अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक शुक्रवारी(दि.१६) स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर झाले. या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून घरपट्टी, पाणीपट्टीत कोणतीही वाढ न करता सर्वसामान्य नागरीकांना दिलासा देण्यात आला असला तरी, महापालिका हद्दीतील कारखाने, उद्योगधंदे, हॉटेल्ससह सर्व वाणिज्य आस्थापनांवर प्रथमच व्यवसाय परवाना शुल्क लागू करण्यात आला असून, या आस्थापनांच्या इलेक्ट्रीक, एलईडी पाट्यांवरही नव्याने जाहीरात कर आकारला जाणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १० कोटींची टोकण तरतूद, महिलांच्या स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य योजना आणि दिव्यांगांसाठी विशेष उद्यान वगळता मनपाच्या मिळकतींचा बीओटीवर विकास, नमामि गोदा, स्मार्ट स्कूल, पेठरोड काँक्रीटीकरण, रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा पुनर्विकास, शाळा कॉलेजांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर आदी जुन्यांच योजनांचा समावेश करण्यात आल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अंदाजपत्रकातून नाशिककरांना फारसे नवे काही हाती लागू शकलेले नाही. (NMC Budget २०२४-२५)

स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत २९८.३३ कोटी आरंभी शिल्लकेसह २३८०.२८ कोटींचे २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे सुधारीत तर २०२४-२५ या आर्थिक वर्षाकरीता ६१.०३ कोटी आरंभीच्या शिलकेसह २६०३.४९ कोटी जमेचे व २६०२.४५ कोटी खर्चाचे प्रारूप अंदाजपत्रक मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरूट यांनी प्रशासक डॉ. करंजकर यांना सादर केले. नवीन विकासकामांसाठी ५३५ कोटींची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली असून, शहरातील रस्ते, पदपथ, उड्डाणपुल, जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, परिवहन सेवा, विद्युतीकरण, उद्यान विकास, शिक्षण, वैद्यकीय सेवा, घनकचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधांची पुर्तता करताना समतोल विकासाचा प्रयत्न या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून करण्यात आल्याचा दावा आयुक्तांकडून करण्यात आला असला तरी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना दिलासा देणारी एकही महत्त्वाकांक्षी योजना या अंदाजपत्रकात नसल्यामुळे ‘मागच्या पानावरून पुढे’ अशीच गत या अंदाजपत्रकाची आहे. आगामी वर्षात महापालिकेला जीएसटी अनुदान, स्थानिक संस्था कर व १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभाराच्या थकबाकीसह १४७२.४९ कोटी रुपयांचा महसुल शासनाकडून प्राप्त होणार आहे. घरपट्टी व पाणीतून तब्बल २४८.१६ कोटी, नगररचना शुल्कापोटी २४४ कोटी, जाहिरात व परवाने शुल्कातून ४४.५८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तर, महापालिकेच्या उत्पन्नवाढीच्या उद्देशाने मोक्याच्या ठिकाणी असलेल्या महापालिकेच्या ६ मिळकती बीओटी तत्वावर विकसित केल्या जाणार असून, या माध्यमातून १५० कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. याशिवाय महापालिकेच्या इमारती तसेच खुल्या भूखंडांवर ३००हून अधिक मोबाईल टॉवरची उभारणी केली जाणार असून यामाध्यमातून महापालिकेसाठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण केला जाणार आहे. (NMC Budget २०२४-२५)

अंदाजपत्रकातील ठळक तरतूदी (NMC Budget २०२४-२५)

* घरपट्टी व पाणीपट्टीत कोणतीही करवाढ नाही

* मनपाच्या मिळकतींचा बीओटीवर विकास करणार

* सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १० कोटींची टोकन तरतूद

* शहरात २५ आपला दावाखाने सुरू करणार

* फेरीवाल्यांकडून दैनंदिन जागा लायसन्स फी वसुली आता आॉनलाईन

* एनजीओंच्या माध्यमातून रोड सेफ्टी आॉडीट करणार

* रामोजी फिल्मसिटीच्या धर्तीवर फाळके स्मारकाचा पुनर्विकास

* नवीन नाशिक, नाशिकरोड व पंचवटीला विद्युत दाहिनी

* आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीअमच्या दुसऱ्या टप्प्यासाठी तरतूद

* मोडकळीस आलेल्या कत्तलखान्यांचा पुनर्विकास

नगरसेवक नसले तरी तरतूद कायम

महापालिकेतील लोकप्रतिनिधींची राजवट संपुष्टात येऊन आता पावणेदोन वर्षांचा कालावधी होत आला असून आगामी वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुका लक्षात घेता महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकांची शक्यता धूसर दिसत असली तरी नगरसेवकांच्या स्वेच्छा निधी तसेच प्रभाग विकास निधीसाठी या अंदाजपत्रकात अनुक्रमे १३.५९ कोटी व ४२.९० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सदर तरतुदीतून प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील ५ लाख रुपये मर्यादेतील अत्यावश्यक व स्थानिक स्वरूपाचीकामे हाती घेण्यात येतील. सदर कामांना प्रभाग समिती स्तरावर प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे.

महिलांसाठी अर्थसाहाय्य योजना

महिला व बालकल्याणासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ५ टक्के निधीतून घटस्फोटीत, विधवा परित्यक्ता महिला तसेच मुलांकरीता विविध चार कल्याणकारी योजना महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. चालु आर्थिक वर्षात२९५ महिलांनी या योजनांचा लाभ घेतला आहे. आता याच बरोबर महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसाहाय्य योजना या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आली आहे. दिव्यांगांसाठीच्या योजना यापुढील काळातही कायम ठेवताना दिव्यांगांसाठी गंगापूर गाव येथील स.नं. १५७पै. जागेत स्वतंत्र विशेष उद्यान, ज्येष्ठ नागरीकांसाठी विरंगुळा केंद्र, युवकांच्या सबलीकरणासाठी योजनांचा समावेश अंदाजपत्रकात आहे.

सिटीलिंकच्या तरतुदीला कात्री

महापालिकेच्या अंदाजपत्रकात सिटीलिंकसाठी दरवर्षी तरतूद करण्यात येते. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात सिटीलिंकसाठी ९२.८० कोटींची सुधारीत तरतूद करण्यात आली होती. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मात्र सिटीलिंकच्या तरतुदीला कात्री लावण्यात आली. आगामी आर्थिक वर्षाकरीता सिटीलिंकसाठी ८०.७५ कोटींचीच तरतूद करण्यात आली आहे. चालु आर्थिक वर्षाच्या तुलनेत आगामी आर्थिक वर्षात सिटीलिंकच्या तरतुदीत १२.०५ कोटींची कपात करण्यात आली आहे. दररोज सरासरी ८३ हजारांहून अधिक प्रवाशी सिटीलिंकने प्रवास करतात. पीएम ई-बसेस योजनेअंतगत सिटीलिंकसाठी ५०इ-बसेस खरेदी केल्या जाणार आहेत.

या जुन्याच योजनांचा समावेश

२०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मनपाच्या मिळकतींचा बीओटीवर विकास, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी, पेठ रोड काँक्रीटीकरण, सीबीएस ते कॅनडा कॉर्नर मॉडेल रोड, अपघात प्रवण क्षेत्रांसाठी उपाययोजना, आडगाव ट्रक टर्मिनस येथे इलेक्ट्रीक बस डेपो, बेघर निवारा केंद्र, पुल, उड्डाणपुलांचे स्ट्रक्चरल आॉडीट, फाळके स्मारकाचा पुनर्विकास, सायन्स सेंटर येथे टिंकरींग लॅब, शाळा-महाविद्यालयांसाठी कॉमन फॅसिलिटी सेंटर, ९० मीटर उंचीची अग्निशमन शिडी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीकेट स्टेडीअम, गंगापूर धरण थेट जलवाहिनी, नमामि गोदा, मलनिस्सारण व्यवस्था, एन कॅपअंतर्गत ई चार्जिंग स्टेशन्स, पर्यावरण संवर्धन, स्मार्ट स्कूल, घनकचरा व्यवस्थापन आदी जुन्याच प्रकल्पांसाठी तरतूद करण्यात आली आहे.

असा येणार निधी(आकडे कोटीत)

जीएसटी अनुदान व १टक्के मुद्रांक शुल्क- १४७२.४७

मालमत्ता कर – २४१.२५

नगरनियोजन- २०८.७३

पाणीपट्टी- ७३.२२

मिळकत, आरोग्य, सार्वजनिक वाहतुक – २२४.६९

रोड डॅमेज चार्ज, ड्रेनेज, पाणी जोडणी शुल्क – ९९.१८

अनुदाने – ७.५३

परिवहन सेवा- ०

संकीर्ण- २८.६६

अग्रीम- १८६.७२

कर्ज – ०.०१

सुरूवातीची शिल्लक- ६१.०३

एकूण – २६०३.४९

असा खर्च होणार( आकडे कोटीत)

सार्वजनिक बांधकाम- ३४६.५७

पाणीपुरवठा, मलनिस्सारण- २१२.३६

विद्युत व यांत्रिकी व्यवस्थापन- ९७.०६

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन – ४४.३३

घनकचरा व्यवस्थापन- १४२.४७

उद्यान व्यवस्थापन- ३३.९३

शिक्षण व्यवस्थापन- १२.३७

सार्वजनिक वाहतुक व नियोजन- ९३.१०

नगरनियोजन व्यवस्थापन- १२०

मालमत्ता कर २.७५

नगरसेवक निधी, प्रभाग विकास निधी – ५६.४८

अन्य १६७.५४

आस्थापना खर्च १००१.८३

अग्रीम – १०७.१४

एकूण – २६०२.४४

हेही वाचा :

The post नाशिक महापालिकेचे २,६०३ कोटींचे अंदाजपत्रक सादर appeared first on पुढारी.