एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांमध्ये सेटलमेंट ; अब्रू नुकसानीचा दावा मागे

गुलाबराव, खडसे www.pudhari.news

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुलाबरावांविरोधात ५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दाखल केला होता. मात्र आता या दोन नेत्यात तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे.

जिल्ह्यात सन २०१६ मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीदरम्यान प्रचार सभांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मात्र या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याने आपली समाजात बदनामी झाली, या कारणाने आमदार खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर पाच कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा जळगाव न्यायालयात दाखल केला होता. या खटल्यात आज जळगाव जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. यासाठी मंत्री गुलाबराव पाटील तसेच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे दोन्ही नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी दोघांमध्ये तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला.

काजल अग्रवालच्या गोल्डन साडीत अदा, एकदा पाहाच

गुलाबरावांनी दिले होते चहापानाचे निमंत्रण

अब्रुनुकसानीच्या खटल्यात गैरहजर राहिल्यामुळे पालकमंत्री पाटील यांना जिल्हा सत्र न्यायालयाने खर्चापोटी ५०० रुपयांचा दंड केला होता. पाटील यांनी माफी मागितल्यास दावा मागे घेण्यासंदर्भात विचार करता येईल, असे खडसे यांनी म्हटले होते. तर माफी मागणं आणि न मागणं हा अहंपणाचा विषय आहे. खडसे हे माझ्यापेक्षा मोठे आहेत, ते कधीही आले, तर त्यांचा पाया पडलो आहे. त्यांना माफी मागितल्याने काही मोठेपणा वाटत असल्यास त्यांनी चहापाण्यासाठी आपल्याकडे यावे, असे आमंत्रण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देत एकप्रकारे नमते घेतले होते. अखेर आज याप्रकरणात तडजोड होऊन दावा मागे घेण्यात आला आहे.

The post एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांमध्ये सेटलमेंट ; अब्रू नुकसानीचा दावा मागे appeared first on पुढारी.