आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : दत्तकेच्छुक पालकांची ‘नकोशी’ ला पसंती

दत्तक www.pudhari.news

नाशिक : अंजली राऊत

‘वंशाला दिवा हवा’, या मानसिकतेतून एकीकडे स्त्रीभ्रूण हत्या होत असताना दुसरीकडे मात्र नाशिकमधील आधाराश्रमातून मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढल्याची आनंददायी बाब आकडेवारीतून पुढे आली आहे. अशोकस्तंभ येथील आधाराश्रमातून गेल्या सहा वर्षांत भारतासह अमेरिका, इटली, जर्मनी येथील पालकांनी तब्बल १२५ अनाथ बालकांना दत्तक म्हणून घेतले आहे. विशेष म्हणजे भारतातूनच नव्हे परदेशातूनही मुली दत्तक घेण्याला पसंती मिळत आहे. १२५ दत्तक बालकांमध्ये ७६ मुली, तर ४९ मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात १६ बालकांना परदेशातील पालकांनी दत्तक घेतले असून, यात ९ मुली तर ७ मुलांचा समावेश आहे.

..ही आहेत कारणे

आधाराश्रमात अनाथ मुली दाखल होण्याचे प्रमाण जास्त असतानासुद्धा पूर्वी मुलांनाच दत्तक घेण्याला प्राधान्य दिले जायचे. त्यामुळे पालकांमध्ये मुली दत्तक घेण्याबाबत जनजागृती शिबिरे, चर्चासत्रे राबविण्यात आल्याचा परिणाम होऊन मुली दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले आहे. दत्तक अपत्य घेण्यासाठी जवळपास तीन वर्षांचा कालावधी उलटतो. त्यामुळे लवकरात लवकर दत्तक घेण्यासाठी पालकांना नंबर लागावा, याकरिता ‘नो चॉइस’ असा पर्याय निवडून मुलगीसुद्धा वंशाचा दिवा असू शकते, असे पालकांच्या मनावर बिंबविण्यात आल्याने पालक आता मुलगीही दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित होत आहेत. त्यामुळे मुलगी दत्तक घेण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती आधाराश्रमाच्या वतीने देण्यात आली. परदेशातूनसुद्धा दत्तक घेण्याचे प्रमाण चांगले असून, सर्वोत्तम सोयी सुविधा व त्वरित औषधोपचार यामुळे भारतातून सिकलसेल, एकच किडनी, स्पेशल लीड असे आजार असणाऱ्या बाळांना दत्तक घेण्यास प्राधान्य दिले जात आहे.

‘दत्तक’ प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे अशी…

ओळखीचा पुरावा (मतदान कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट), पत्त्याचा पुरावा 365 दिवसांहून अधिक काळ भारतात राहत असल्याबाबत, विवाह प्रमाणपत्र, कुटुंबाचे छायाचित्र (पोस्टकार्ड साइजमध्ये तीन प्रत), आरोग्य प्रमाणपत्र, कुटुंबाला चांगल्या प्रकारे ओळखणाऱ्या दोन व्यक्तींची शिफारस पत्रे व आधारकार्ड, स्वत:चा व्यवसाय असल्यास गेल्या तीन वर्षांच्या आयटीची स्टेटमेंट, नोकरी करीत असल्यास प्रमाणपत्र, गेल्या सहा महिन्यांचे बँक स्टेटमेंट, कुटुंबाच्या मालकीच्या स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशील, दत्तक इच्छुक पालकांनी घेतलेल्या कर्जाचा तपशील, सात वर्षे वयावरील जैविक व दत्तक अपत्य असल्यास त्याचे लेखी संमतीपत्र, दत्तक इच्छुक पालकांचा घटस्फोट अथवा कायदेशीर विभक्तता असल्यास पत्र, जवळच्या नातेवाइकांचे काही आकस्मिक परिस्थिती उद्भवल्यास बाळाचे संगोपन करण्यास तयार असल्याबाबत 100 रु. च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र व नोटरी, वयाचा पुरावा, मुले असल्यास त्यांच्या वयाचा पुरावा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, नोकरी प्रमाणपत्र, दत्तक प्रेरणापत्र, दोन्ही अर्जदार नोकरी करत असल्यास बालसंगाेपन व्यवस्थेबाबत पत्र, पोलिसामार्फतचा चारित्र्य पडताळणी दाखला.

भारतातील दत्तक घेण्याचे प्रमाणे असे….

वर्ष                                    मुली           मुले      एकूण

2017                                12             2           14

2018                                18             6           24

2019                                  8            11         19

2020                                 15          11          26

2021                                 10           5           15

2022 ते आजपर्यंत               4            7            11

परदेशातील दत्तक घेण्याचे प्रमाण असे…

2017 – मुली (2 – स्पेन व यूएस) तर मुलगा (3 – यूएस, मालता)

2018 – मुलगी (1 – मालता) तर मुलगा ( 1 – यूएसए 1 – इटली)

2019 – मुली (2 – यूएसए)

2020 – मुले ( 1 – यूएसए 1 – ऑस्ट्रिया)

2021 – मुली (2 – इटली, ऑस्ट्रिया)

2022 ते आजपर्यंत – ( मुली 2 – इटली, ऑस्ट्रीया)

(भाग – 1)

हेही वाचा:

The post आंतरराष्ट्रीय दत्तक जागृती महिना : दत्तकेच्छुक पालकांची 'नकोशी' ला पसंती appeared first on पुढारी.