कोरोना महामारीनंतर नाशिकमध्ये क्षयरोग अर्थात टीबीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०२३ मध्ये नाशिक शहरात क्षयरोगाचे ३,३९७ रुग्ण होते. त्यात गेल्या अडीच महिन्यांतच तब्बल ५८५ ने भर पडली असून, दररोज सात ते आठ नवे क्षयरुग्ण आढळत असल्याने क्षयरोग निर्मूलनाचे मोठे आव्हान नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागासमोर उभे ठाकले आहे.
क्षयरोग हा एक घातक संसर्गजन्य आजार आहे. कोरोना आणि क्षयरोगाची लागण झालेल्या रुग्णांची लक्षणे जवळपास सारखची आहेत. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना हा रोग लवकर बळावतो. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे क्षयरोगासारखा आजार बळावण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे कोरोनानंतर क्षयरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून दिसत आहे. २०२० मध्ये नाशिक शहरात क्षयरोगाचे २१०९ रुग्ण होते. २०२१ मध्ये ही रुग्णसंख्या २७३५ वर गेली, तर २०२२ मध्ये क्षयरुग्णांचा आकडा सर्वाधिक ३५९३ इतका होता. २०२३ मध्येदेखील क्षयरुग्णांची संख्या ३३९७ इतकी होती. याचाच अर्थ कोराेनानंतर शहरात क्षयरोगाचा प्रादुर्भाव वाढत गेला. जानेवारी ते २० मार्च या अडीच महिन्यांच्या कालावधीतही या आजाराचे तब्बल ५८५ नवे रुग्ण आढळले आहेत. याचाच अर्थ दररोज ७ ते ८ जणांना या आजाराची लागण होत आहे. त्यामुळे नाशिककरांची चिंता वाढली आहे. गेल्या चार वर्षांतील क्षयरुग्णांच्या बरे होण्याचे सरासरी प्रमाण ८५ टक्के इतके आहे. ही बाब सकारात्मक असली तरी लागण झालेल्या रुग्णसंख्येचा आकडा पाहता या आजारामुळे मृत्यू होणाऱ्या १५ टक्के रुग्णांची संख्याही कमी नसल्याने या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासकीय यंत्रणांकडून युद्धपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार
क्षयरुग्णांवर महापालिकेच्या पाचही रुग्णालये, ३० शहरी आरोग्य सेवा केंद्रांमध्ये मोफत उपचाराच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री टीबीमुक्त कार्यक्रमांतर्गत समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, (निक्षय मित्र) यांच्यामार्फत क्षयरुग्णांना मोफत शिधावाटप करण्यात येते. आॅक्टोबर २०२२ पासून निक्षय मित्र योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत २५९ निक्षय मित्रांमार्फत क्षयरुग्णांना मदत करण्यात येत आहे.
गेल्या पाच वर्षांतील क्षयरुग्णांची संख्या
वर्ष रुग्णसंख्या बरे होण्याचे प्रमाण
२०२० २१०९ ८७%
२०२१ २७३५ ८८%
२०२२ ३५९३ ९०%
२०२३ ३३९७ ७०%
जाने. ते २० मार्च २०२४ ५८५
क्षयरोग म्हणजे काय?
क्षयरोग अथात टीबी हा आजार मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस (एमटीबी) बॅक्टेरिया म्हणून ओळखल्या जाणार्या जीवाणूंद्वारे मिळवलेला एक घातक संसर्गजन्य आजार आहे. जगभरात सुमारे १० दशलक्ष लोकांना सक्रिय टीबी आहे. सांसर्गिक असल्याने, क्षयरोग एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीकडे सहज प्रसारित होत नाही. हे मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करते आणि मूत्रपिंड, मेंदू आणि पाठीचा कणा यांसारख्या शरीराच्या इतर अवयवांनादेखील नुकसान करते. क्षयरोग पूर्णपणे बरा आणि प्रतिबंध करण्यायोग्य आहे. क्षयरोग हा हवेतील थेंबांद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो.
क्षयरोगाची लक्षणे
क्षयरोगाच्या सुरुवातीच्या टप्प्याला प्राथमिक संसर्ग म्हणतात. यात रुग्णाला ताप, थकवा, खोकला जाणवतो. दुसऱ्या टप्प्यातील सुप्त क्षयरोग किंवा निष्क्रिय क्षयरोग हा संसर्गजन्य नाही, परंतु त्याचे रूपांतर सक्रिय क्षयरोगात होऊ शकते, त्यामुळे त्वरित उपचार आवश्यक आहेत. तिसऱ्या टप्प्यातील सक्रिय क्षयरोगाची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या इतरांनाही या आजाराचे संक्रमण होते. जीवाणूंचा संसर्ग झाल्यानंतर काही आठवडे किंवा वर्षांनंतर प्रसार क्षमता येऊ शकते. यात रक्त किंवा श्लेष्मयुक्त खोकला, रात्री घाम येतो, वजन कमी होणे, थकवा, छाती दुखणे, श्वास घेताना किंवा खोकताना वेदना होणे, ताप येणे अशी लक्षणे आढळतात.
क्षयरोगाच्या संसर्गाची कारणे
जेव्हा क्षयरोगाचा रुग्ण शिंकतो, खोकतो, हसतो किंवा गातो तेव्हा हवेच्या थेंबांद्वारे पसरतो. एखाद्या व्यक्तीला संसर्ग होण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने उपचार न केलेल्या क्षयरोगाच्या रुग्णाशी बराच काळ जवळचा संपर्क असणे आवश्यक आहे. रोग होण्यासाठी त्याला टीबीचे जंतू श्वास घेणे आवश्यक आहे. हा रोग स्वयंपाकघरातील भांडी किंवा एखाद्याला चुंबन घेताना लाळेच्या संपर्कात आल्याने विकसित होत नाही.
क्षयरोग टाळण्यासाठी…
क्षयरोग होऊ नये यासाठी क्षयरोग झालेल्या रुग्णांच्या संसर्गात येऊ नये. क्षयरोग झालेल्या रुग्णांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, घरी राहावे. खोकताना तोंड झाका. चांगला फेस मास्क वापरा.
असे करा उपचार..
क्षयरुग्णांवर प्रतिजैविकांनी उपचार केले जातात. उपचार सहा महिने ते एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ टिकू शकतात. थेट निरीक्षण थेरपी अर्थात ‘डॉट’द्वारे उपचार केले जातात. उपचारादरम्यान प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी आणि संसर्ग औषधांना प्रतिसाद देत असल्याची खात्री करण्यासाठी नियतकालिक चाचण्या केल्या जातात. यामध्ये थुंकीच्या चाचण्या, छातीचा एक्स-रे आणि इतर संबंधित मूल्यांकनांचा समावेश असू असतो. जर क्षयरोगाचा संसर्ग अत्यंत संसर्गजन्य असेल किंवा बहुऔषध-प्रतिरोधक स्ट्रेनचा समावेश असेल, तर संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी अलग ठेवणे आवश्यक असू शकते. लक्षणे सुधारत असली तरीही, लिहून दिल्याप्रमाणे औषधांचा संपूर्ण कोर्स पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. अपूर्ण उपचारांमुळे औषध-प्रतिरोधक टीबी होऊ शकतो, ज्यामुळे उपचार करणे अधिक आव्हानात्मक होते.
The post धक्कादायक! कोरोनानंतर नाशिकमध्ये टीबीच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ appeared first on पुढारी.