जळगाव पुढारी वृत्तसेवा – जामनेर तालुक्यातील सीआरपीएफचा जवान असलेल्या व क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा अंगरक्षक याने आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. त्याने स्वत:वरच गोळी झाडून जीवन संपविले आहे. या बातमीने परिसरात खळबळ उडाली आहे.
घटनेमागचे कारण काय?
- त्याने हे पाऊल का उचलले याबाबत नेमके कारण समजू शकलेले नाही.
- मात्र जामनेर पोलीस पुढील तपास करीत आहे.
- मृतदेह जळगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, जामनेर शहरातल्या गणपती नगरातील मूळ रहिवासी असलेला प्रकाश गोविंदा कापडे ( वय ३७ ) हा सीआरपीएफ मध्ये जवान म्हणून कार्यरत होता. त्याची सध्याला सचिन तेंडुलकर याचा अंगरक्षक म्हणून नियुक्ती होती. सुटी घेऊन तो गेल्या आठ दिवसांपासून जामनेर येथे आपल्या घरी आलेला होता.
घटनेमुळे परिसरात हळहळ
रात्री (दि.15) 1.30 वाजेच्या सुमारास प्रकाश कापडे याने गोळी झाडून स्वत:ला संपविले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावाची पत्नी व त्याची मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतदेह शव-विच्छेदनासाठी रुग्णालयात
प्रकाश कापडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात आणण्यात आलेला आहे. शव विच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतर मृतदेह परिवाराकडे सुपूर्त करण्यात येईल. या संदर्भात जामनेर पोलिसात तक्रार नोंदविण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा –
- Mango Export | नाशिकच्या लासलगावमधून दीड महिन्यात ६०० टन आंब्यांची परदेशवारी
- राज्यात लाल सिंधी गायींची वंशावळ सुधारणा होणार : कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील
- तरुणीला बळजबरीने पाजली बिअर.. आणि नंतर घाणेरडे कृत्य; व्यावसायिकाला अटक