धुळे : दंड टाळण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेणे भोवले

लाच घेताना अटक ,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

दुचाकी वरील दंडाची रक्कम टाळण्यासाठी 200 रुपयांची लाच घेणाऱ्या धुळे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लायसन आणि कागदपत्रांच्या मागणी करून वाहतूक शाखेच्या या कर्मचाऱ्याकडून पैसे उकळले जात असल्याचे तक्रारदाराने आरोप केला आहे.

चाळीसगाव येथे राहणाऱ्या एका तरुणाने या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई झाली आहे. तक्रारदार यांचे धुळे शहरात नेहमी कामानिमित्त येणे जाणे होते. या तक्रारदाराला धुळे शहरातील तहसील कार्यालयाच्या चौकात नेमणुकीस असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून अडवले जात होते. दुचाकी चालवण्याचा परवाना तसेच कागदपत्रांची मागणी करून त्याला थांबवले जात होते. त्याचप्रमाणे कारवाई करू नये यासाठी लाच वसूल केली जात होती. या सर्व त्रासाला कंटाळून त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार उपाधीक्षक अनिल बडगुजर यांनी कायदेशीर प्रक्रिया पार पाडून शहरातील तहसील कार्यालयाच्या चौकात सापळा लावला.

पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण व प्रकाश झोडगे तसेच राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, गायत्री पाटील, भूषण शेटे, रामदास बारेला, वनश्री बोरसे, रोहिणी पवार, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, जगदीश बडगुजर, सुधीर मोरे या पोलीस कर्मचाऱ्यांनी या चौकात साध्या वेशामध्ये टेहळणी सुरू केली. यानंतर तक्रारदार याला शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी उमेश दिनकर सूर्यवंशी यांनी अडवले. यावेळी तक्रारदाराने वाहन चालवण्याचा परवाना दाखवला. मात्र तरीही दोनशे रुपये लाचेची मागणी करण्यात आली. या वाहनावर ऑनलाईन दंड टाळण्यासाठी 200 रुपयाची मागणी करण्यात आली. ही लाच स्वीकारत असताना सापळा लावलेल्या पथकाने पोलीस कर्मचारी उमेश सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात धुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

The post धुळे : दंड टाळण्यासाठी दोनशे रुपयांची लाच घेणे भोवले appeared first on पुढारी.