नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे

शेतकरी

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यातील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु पाऊस सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. शेतीची मशागत झाली आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडेल अशी अपेक्षा पूर्ण झाली नाही. मृग नक्षत्र जवळपास कोरडेच गेले. या कालावधीत सोयाबीन, भुईमूग, टोमॅटोचे रोप तयार करणे, मूग, उडीद, भाताची रोपे तयार करणे बरेच कामे आहेत. परंतु अजून पाऊस पडत नसल्याने या सर्व गोष्टी लांबणीवर पडत चालल्या आहे.

जून महिना संपत आला असताना बळीराजा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. मृग नक्षत्राचा पाऊस दिंडोरी तालुक्यात नेहमीच जोरदार हजेरी लावीत असतो. परंतु हे नक्षत्र सुरू होऊन काही दिवस उलटले तरी पाऊस पडण्याची चिन्हे नाही. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत.

मागील वर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे जवळजवळ १७२३३ हेक्टर क्षेत्र निश्चित असताना चांगला खरीप हंगाम घेण्यात आला होता. परंतु यंदा तालुका शेतकी विभागाने १८०० हेक्टरच्यावर खरीप पेरणीक्षेत्र निश्चित केले, परंतु पावसाने लहरीपणा दाखविल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

सध्या तालुक्यातील सर्वची धरणांनी जवळजवळ तळ गाठला आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी सुरुवातीला पाऊस पडणे गरजेचे झाले असताना मात्र तालुक्यात फक्त पावसाळी व ढगाळ वातावरण तयार झाल्याने व पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. मान्सूनपूर्व मशागत झाली आहे. बी-बियाणे लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करून ठेवली आहे.

खरीप हंगामावर अस्मानी संकट

पावसाळ्यातील काही नक्षत्र शेतीसाठी चांगले मानले जातात. मृग नक्षत्र बरसले तर पीकपाणी चांगले येते असे समजले जाते. परंतु जून संपत आला तरी अजून पावसाने हजेरी न लावल्याने खरीप हंगामावर अस्मानी संकट उभे राहते की काय? असे चित्र सध्या तालुक्यात सर्वत्र दिसत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे appeared first on पुढारी.