धुळे पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यकास लाच घेताना रंगेहाथ अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा

लेखापरीक्षणाच्या नावाखाली 3500 ची लाच स्वीकारणाऱ्या पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कनिष्ठ सहाय्यकाला धुळ्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे बांधकाम विभागातील लाचखोरांचे रॅकेट ऐरणीवर आले आहे. दरम्यान शासकीय विभागात कार्यरत असलेल्या कुणीही लाचेची मागणी केल्यास तातडीने संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी केले आहे.

तक्रारदार हे पंचायत समितीच्या शाखा अभियंता या पदावर कार्यरत असून ते एप्रिल 2022 पर्यंत रतनपुरा बिट येथे नेमणुकीस होते. या कालावधीतील बीटचे विभागीय लेखापरीक्षण करण्यात आले. या लेखापरीक्षणाच्या नावाने बक्षीस म्हणून कनिष्ठ सहाय्यक शामकांत सोनवणे हे तक्रारदार असणाऱ्या शाखा अभियंत्याकडून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून संपर्कात होते. त्यानंतर  प्रत्यक्ष भेट तसेच मोबाईलव्दारे संपर्क करून तीन हजार पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली. त्यावर तक्रारदाराने धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली. त्यानुसार उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी तक्रारीची पडताळणी करत कनिष्ठ सहाय्यक शामकांत सोनवणे यांनी तक्रारदाराकडे पंचांच्या समक्ष पुन्हा लाचेची मागणी केल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे व मंजीतसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, भूषण खलाणेकर ,भूषण शेटे, संतोष पावरा, गायत्री पाटील ,प्रशांत बागुल, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, रोहिणी पवार, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा लावला. त्यानुसार तक्रारदार यांच्याकडून शामकांत सोनवणे या कनिष्ठ सहाय्यकाने लाचेची रक्कम स्विकारताच रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्या विरोधात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमुळे बांधकाम विभागातील लाचखोरांचे रॅकेट चव्हाट्यावर आले आहे. दरम्यान कोणतेही विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी केल्यास तातडीने धुळे येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागास संपर्क करण्याचे आवाहन पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post धुळे पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ सहाय्यकास लाच घेताना रंगेहाथ अटक appeared first on पुढारी.