धुळ्यात पुष्पा स्टाईल मद्याची तस्करी करण्याचा प्रकार उघड

धुळे पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत केलेल्या कारवाईत सुमारे 16 लाख 90 हजार रुपयाची बनावट दारू जप्त केली आहे. या दारू तस्करीसाठी वापरली जाणारी स्विफ्ट कार आणि आयशर असा एकूण 36 लाख 90 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला असून चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे या दारू तस्करांनी पुष्पा चित्रपटाच्या पद्धतीने सिमेंटचे शीट मध्यभागी कापून दारूचे 400 बॉक्स लपवले होते. मात्र पोलिसांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला.

धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्पेशल ड्राईव्ह घेऊन अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या अंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वेगवेगळे पथक तयार करून धुळे जिल्ह्यात स्पेशल ड्राईव्ह राबवणे सुरू केले. यातच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना दारू तस्करीची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी तसेच अमरजीत मोरे, कॉन्स्टेबल पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी ,राजेंद्र गीते यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांना या गाडीचा शोध घेण्याचे आदेश देत गस्त वाढवली. यात धुळे तालुक्यातील नगाव शिवारात धुळे शहराकडून सोनगीरच्या दिशेने एमएच 47 बी एल 29 67 क्रमांकाची स्विफ्ट कार संशयितरित्या जाताना आढळली. या कारच्या पाठोपाठ एमएच ०५ इ एम 71 76 क्रमांकाचा आयशर देखील दिसून आला. या दोन्ही गाड्यांच्या चालकांची संशयित हालचाल पाहून शिंदे यांच्या पथकाने या दोन्ही गाड्या थांबवून चालकांचे चौकशी सुरू केली. यात स्विफ्ट गाडीमध्ये मुंबई येथील प्रदुम्न जीतनारायण यादव, वीरेंद्र कल्पनाथ मिश्रा तर आयशरमध्ये कल्याण येथील श्रीराम सुधाकर पारडे तसेच राजस्थान मधील राकेश रामस्वरूप शर्मा शर्मा ही नावे पुढे आली. या चौघांची चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिली. त्यामुळे दोन्ही गाड्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात आणून तपासणी केली असता आयशर वाहनांमध्ये सिमेंटचे पत्रे भरलेले आढळून आले. मात्र गुप्त माहिती दाराने दिलेली माहिती खरी असल्यामुळे ही सिमेंटचे पत्रे खाली उतरवत असताना पत्रांना मध्यभागी कापून त्यात मद्याचे बॉक्स लपवल्याची बाब उघड झाली. या गाडीतून रॉयल ब्ल्यू कंपनीचे 320 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. या संदर्भात या आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा मध्य साठा आढळून आला आहे मात्र प्राथमिक चौकशी मध्ये मद्यसम्राट यांनी हा मद्य साठा नेमका कुठे जाणार होता, यांचा कोणताही धागा दोरा ठेवला नसल्याची बाब उघड झाली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दिशेकडून आलेला हा मद्य साठा शिरपूरकडे जात होता. मात्र ही तस्करी गुजरात राज्यात होणार असल्याची प्राथमिक माहिती देखील पुढे येते आहे. या तस्करीसाठी विशिष्ट किलोमीटर अंतर कापल्यानंतर गाड्यांचे चालक देखील बदलण्यात येत असल्याने मद्यसाठा पाठवणारा तस्कर कोण आणि साठा नेमका कुणाकडे जात होता. याचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलीस पथकाच्या पुढे उभे राहिले आहे. असे असले तरीही तस्करी करणारा मुख्य म्होरक्या गजाआड करणार असल्याचा विश्वास पोलीस अधीक्षक श्रीकांत धावरे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा –

The post धुळ्यात पुष्पा स्टाईल मद्याची तस्करी करण्याचा प्रकार उघड appeared first on पुढारी.