आईचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा

जन्मठेप,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आईचा गळा आवळून खून करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अल्लाउद्दिन कमरुद्दिन शेख (३०, रा. गणेशनगर, वडाळागाव) असे आरोपीचे नाव आहे. त्याने दि. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी त्याच्या आईचा खून केला होता.

अल्लाउद्दिन शेख हा काही कामधंदा करीत नसल्याने त्याची आई रुक्साना शेख (६८) यांनी त्यास वारंवार काम करण्याचा सल्ला दिला होता. १४ नोव्हेंबरलाही आईने त्याला काहीतरी काम कर असे सांगितल्याने संतप्त होत त्याने थेट आईचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने हातपाय बांधून मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर इंदिरानगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन सहायक पाेलिस निरीक्षक एन. एन. मोहिते यांनी तपास करीत अल्लाउद्दिन शेखविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. अपर्णा पाटील व रेवती कोतवाल यांनी युक्तिवाद केला. गुन्हा शाबित झाल्याने न्यायाधीश आर. एन. शिंदे यांनी शेखला जन्मठेप व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सुधाकर गायकवाड, रशीद शेख यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

The post आईचा खून करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा appeared first on पुढारी.