नायगव्हाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू

नाशिक

नगरसुल(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; येवला तालुक्यातील नायगव्हाण येथील सरपंच सुनील साळवे यांच्या वस्तीवर आज  (दि.६) पहाटे ४:०० वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. यामध्ये शेडवरून उडी मारून बिबट्याने ४ शेळ्यांचा शेडमध्येच जाग्यावर फडशा पाडला आणि एक शेळी जवळील शेतात नेऊन खाल्ली आहे.

संबंधित सुर्यभान गुळचंद साळवे या शेतकऱ्याचे सुमारे एक लाखाहुन अधिक नुकसान झाले आहे. यावेळी सरपंच सुनीलभाऊ साळवे यांच्या सकाळी हे निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ वनविभागाला कळविले आणि घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी वनपाल वंदना थोरात मॅडम यांना बोलावून घेतले. त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि संबंधित व्यक्तीला नुकसान भरपाई मिळवून देऊ असे आश्वासन दिले.

नायगव्हाण येथील वस्त्यांवर आणि ग्रामस्थ अतिशय भितीच्या वातावरणात सध्या राहत आहेत. तरी वनविभागाने आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये असे सरपंच यांनी आवाहन केले आहे. यावेळी बरेच ग्रामस्थ आणि नुकसानग्रस्त कुटुंब हजर होते.

हेही वाचा :

The post नायगव्हाण येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.