नाशिकच्या आखाड्यात सूनबाई? ही दोन नावे आता चर्चेत

शेफाली भुजबळ, भक्ती गोडसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत अनेकांची नावे चर्चेत आली असून, त्यात आता मंत्री छगन भुजबळ यांच्या सूनबाई शेफाली भुजबळ आणि खासदार हेमंत गोडसे यांच्या सूनबाई भक्ती गोडसे यांच्या नावांची भर पडली आहे. सोशल मीडियावर दोघींचीही नावे चर्चिले जात असून, त्यात कितपत तथ्य आहे, हा मात्र प्रश्न आहे.

नाशिकच्या जागेचा तिढा अद्यापही कायम असून, उमेदवारीबाबत अंदाज बांधणे अवघड होत आहे. दररोज नवी नावे चर्चिले जात असल्याने, नाशिकची उमेदवारी कोणास दिली जाईल हा प्रश्न मतदारच उपस्थित करीत आहेत. आतापर्यंत अनेकांची नावे पुढे आली आहेत. आता त्यात आणखी दोन नावांची भर पडली आहे. एक म्हणजे शेफाली भुजबळ अन् दुसरे भक्ती गोडसे यांची नावे चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून विशेषत: भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब केल्याचे सुरुवातीपासूनच दिसून आले आहे. या मतदारसंघावरदेखील भाजपचे लक्ष असल्याने, येथेदेखील तसा प्रयोग केला जाणे शक्य आहे. आतापर्यंत विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासह मंत्री छगन भुजबळ यांची नावे उमेदवारीसाठी आघाडीवर राहिली आहेत. मात्र, दोघांपैकी कोणासही उमेदवारी दिली नसल्याने, महायुतीकडून नेमका कोणता उमेदवार रिंगणात उतरविला जाईल, असा प्रश्न आहे. दरम्यान, शेफाली भुजबळ आणि भक्ती गोडसे यांची नावे पुढे आल्याने नाशिकच्या जागेबाबत आणखीनच उत्सुकता वाढल्याचे चित्र आहे.

यांची नावे चर्चेत

नाशिक लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत अनेकांची नावे चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह खासदार प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चिले गेले. अर्थात या सर्व चर्चा ठरल्या. याव्यतिरिक्त मंत्री छगन भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, राहुल ढिकले, सीमा हिरे यांचीही नावे पुढे आली. मात्र, या नावांवर अजूनही एकमत होऊ शकले नाही. याव्यतिरिक्त इच्छुकांमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे, अजय बोरस्ते, विजय करंजकर, केदा आहेर, दिनकर पाटील, अनिकेतशास्त्री देशपांडे यांचीही नावे आहेत.

हेही वाचा –