नाशिकच्या चांदवडला वादळी गारपीट, लाखोंचे नुकसान

चांदवड पाऊस

चांदवड : पुढारी वृत्तसेवातालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने वादळी वारा अन‌् गारांसह जोरदार हजेरी लावली. कानमंडाळे गावात वीज पडून बैल ठार झाला. तर जनावरांचे शेड, अनेक घरांचे पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर पडले. विद्युत खांब जमीनदोस्त होऊन तारा तुटल्याने बत्तीगुल झाली आहे. ठिकठिकाणी झाडे देखील उन्मळून पडले. या वादळात लाखोंचे नुकसान झाले आहे.

परसूल, भोयेगाव, भाटगाव, शिरसाने, सोग्रस, शिंदे, कानमंडाळे, शैलू, पुरी, कन्हैरवाडी, हट्टी, कुंडाणे आदी भागात शुक्रवारी (दि.१०) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. कानमंडाळे गावात जोरदार गारपीट झाली. तेथे वादळात १५ ते २० शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे, शेड उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा योजनेसाठी लावलेला सौर प्रकल्प उडून गेला. गावातील विद्युत खांब जमीनदोस्त होऊन तारा तुटल्याने कानमंडाळे पंचक्रोशीतील वीजपुरवठा खंडीत झाला होता. वीज पडून धोंडीराम बाबुराव पवार या शेतकऱ्याचा बैल ठार झाला. गारपीटीत झोपडले गेल्याने अनेक जनावर जखमी झालेत. चंद्रभान गवळी या शेतकऱ्याच्या शेततळ्याचा कागद फाटला. तसेच गारांमुळे द्राक्ष बागांनाही फटका बसला आहे.

यांचे घराचे पत्रे उडाले

कानमंडाळे गावातील संजय घडोजे, विनायक केदारे, चिंधू घडोजे, समाधान जाधव, अशोक चौधरी, सोमनाथ पवार, सीताराम पवार, काकासाहेब पवार, पुंडलिक किरकांडे, समाधान जाधव, शंकर पवार आदीसह इतरांच्या घराचे पत्रे उडून गेले आहेत. या नुकसानीची सरपंच सविता शिंदे, संजय शिंदे, पोलिसपाटील छाया जाधव आदींनी पाहणी करीत पंचनामे करण्याची मागणी केली आहे.

कानमंडाळे गावात वादळी पावसामुळे घरांचे व शेडचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. तसेच एक बैल वीज पडून मयत झाला आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांना दिल्या आहेत. मंदार कुलकर्णी, तहसीलदार, चांदवड.

हेही वाचा –